मुंबई : गोवा येथे होणाऱ्या ‘५२ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’साठी दोन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘मी वसंतराव’ आणि ‘गोदावरी’ या चित्रपटांची एकूण १५ आंतरराष्ट्रीय चित्रपटांसह महोत्सवासाठी निवड झाली आहे.

‘मी वसंतराव’ या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे तर ‘गोदावरी’ हा चित्रपट निखिल महाजन यांनी दिग्दर्शित केला आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारांसाठी एकूण १५ चित्रपट स्पर्धेत आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र आणि ४० लाख रुपयांचा धनादेश असे असून दिग्दर्शक आणि निर्मात्याला विभागून पुरस्काराची रक्कम देण्यात येते. यावेळी महोत्सवाच्या परीक्षक समितीवर भारताचे प्रतिनिधी म्हणून दिग्दर्शक नील माधव पंडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘मी वसंतराव’ हा चित्रपट ३ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु टाळेबंदीमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे. तर ‘गोदावरी’ हा चित्रपट येत्या ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.