रसिका शिंदे-पॉल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे हरहुन्नरी अभिनेते म्हणजे सचिन खेडेकर. रंगभूमीवरून अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या सचिन खेडेकर यांनी पहिल्यांदा दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘इम्तिहान’ या हिंदी भाषिक मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केले. यानंतर मराठीसह इतर भाषिक चित्रपटांतून खेडेकरांनी विविधांगी भूमिका साकारल्या. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य या दोन्ही बाबींमध्ये समतोल राखणारे अभिनेते सचिन खेडेकर सध्या ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. २९ मेपासून ‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरू होणार आहे.

आजवर मी साकारलेल्या अनेक भूमिकांबद्दल विचार करतो त्यावेळी मला काय जाणवतं की मी साकारत असलेल्या भूमिका, माझा अभिनय हे माझे पडद्यावरचे अस्तित्व आहे. माणूस म्हणून माझे विचार काय आहेत किंवा आज अभिनेता म्हणून लोकांसमोर असलो तरी त्यांच्याशी कशाप्रकारे जोडला गेलो आहे हे  खरंतर पडताळून पाहण्याची संधी म्हणजे सूत्रसंचालन असे मला वाटते, अशा शब्दांत सचिन खेडेकर यांनी सूत्रसंचालक होण्यामागची आपली भूमिका विशद केली. ‘कोण होणार करोड़पती’ या  कार्यक्रमाने माझ्या जीवनात आमूलाग्र बदल होईल असे खरे तर कधी वाटले नव्हते, कारण या कार्यक्रमाचे जरी मी सूत्रसंचालन करत असलो तरी तोही एक अभिनयाचाच भाग आहे. पण या निमित्ताने सामान्य माणसांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेता आल्या आणि त्यांचे जीवन हे कलाकारांपेक्षा किती निराळे असते हे जाणून घेण्याची संधी मिळाल्याने आपल्यात माणूस म्हणून बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.

 माझ्या मते सामान्य माणूस आणि कलाकार हे एकमेकांशी सतत जोडले गेलेले असतात आणि आजवर मी साकारलेल्या भूमिका मला सामान्य माणसांकडून आणि प्रेक्षकांमुळेच मिळाल्या आहेत. त्यामुळे कोणतीही भूमिका साकारताना मी त्यांच्यापैकीच एक आहे हे प्रेक्षकांना जाणवले पाहिजे याची खास खबरदारी घेतो, असे त्यांनी सांगितले. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची खरी ओळख ही ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यामुळे आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन जे काम करत आहेत त्या कामाचे आणि कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व मराठी मनोरंजनसृष्टीत करण्याची मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर असताना प्रसंगी दडपण देखील येत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.डिजिटल युगाशी जोडल्या गेलेल्या आणि तांत्रिक दृष्टय़ा अधिक सजग असलेल्या माणसांना जगासमोर आणणारे माध्यम म्हणजे या कार्यक्रमाचे चौथे पर्व असल्याचे सांगत या पर्वाची खासियत म्हणजे विजेत्या स्पर्धकाला २ कोटी रुपयांची रक्कम मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

मराठी प्रेक्षकांच्या आपुलकीची अधिक गरज

 करोनामुळे घरात अडकलेल्या प्रेक्षकांनी आपल्या मनोरंजनासाठी विविध मनोरंजनाची व्यासपीठे शोधून काढली. त्यामुळे मराठी भाषेतील चित्रपट किंवा वेब मालिकांना अन्य भाषेतील चित्रपटांचा किंवा मालिकांचा पर्याय उपलब्ध होत गेला. याचे एक उदाहरण सांगताना खेडेकर म्हणाले, ‘‘माझा ‘फायर ब्रॅन्ड’ नावाचा चित्रपट आला होता. जो २१ भाषांमध्ये अनुवादित करण्यात आला होता. जगभर पाहिल्या गेलेल्या या चित्रपटाला परदेशातून तेथील स्थायिक भारतीयांनीच नव्हे तर परदेशी प्रेक्षकांचीही दाद मिळाली. यावरून एक बाब लक्षात आली ती म्हणजे आपली कलाकृती जगभर पोहोचवण्यासाठी भाषेचा अडसर येत नाही. मराठीतील चित्रपट अथवा वेब मालिका इतर भाषेत अनुवादित किंवा डब करूनही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येते. त्यामुळे आपल्या मातृभाषेवर प्रेम करत प्रेक्षकांनी मराठी चित्रपट पाहून आपल्या राज्यात ती कलाकृती मोठी केली तर त्याला आंतरराष्ट्रीय प्रेक्षक मिळतो अशी सद्य:स्थिती आहे’ असे ठाम मत खेडेकर यांनी मांडले. मराठी प्रेक्षकांनी त्यांची कवाडे मोठी केली पाहिजे. मराठी चित्रपटसृष्टीतही सर्वसमावेशक आशय असलेले चित्रपट अथवा मालिकांची निर्मिती केली जाते, मात्र सध्या मराठी चित्रपट-मालिकांना मराठी प्रेक्षकांच्या आपुलकीची नितांत गरज आहे; जर आपुलकी आणि विश्वासाने मराठी चित्रपटांसाठी अथवा नाटकांसाठी प्रेक्षकांनी गर्दी केली तर  कलाकार म्हणून आम्ही अधिक जोमाने काम करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

‘नटाचे वैयक्तिक आयुष्य हे खासगीच राहावे’

करोनाकाळात एकमेकांशी जोडण्यासाठी समाजमाध्यमाचा वापर अधिक केला जाऊ लागला. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळय़ांनाच आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट लोकांपर्यंत याच माध्यमांतून पोहोचवण्याची सवय लागली, मात्र या सर्व समाजमाध्यमांच्या विश्वापासून आणि समाजमाध्यमावर अधिक सक्रिय न राहणाऱ्या काही कलाकारांपैकी एक म्हणजे सचिन खेडेकर. समाज माध्यमांबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘‘समाजमाध्यमाबाबत मी निरुत्साही आहे असे नाही. मी अजूनही मागच्या पिढीचा आहे असे समजतो; आणि मला असे वाटते की माझ्या कामातून मी अधिक बोलावे आणि प्रेक्षकांशी प्रत्यक्षात संवाद साधावा’’. नट आणि नटाचे वैयक्तिक आयुष्य हे खासगीच राहायला हवे, अशी आपली धारणा असल्याचे स्पष्ट करत प्रत्येकाने व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन यात समतोल बाळगायला शिकले पाहिजे. महत्वाचे म्हणजे समाजमाध्यमांचा कामापुरताच वापर प्रत्येकाने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Impressing your performance the actor is sachin khedekar ysh
First published on: 28-05-2023 at 00:02 IST