Samay Raina Talks About Rakhi Sawant : कॉमेडियन समय रैना काही दिवसांपूर्वी त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमामुळे अडचणीत सापडला होता. या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्यानंतर समयविरोधात याचिका दाखल झाली आणि सोशल मीडियावर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. अशातच आता काही दिवस लोटल्यानंतर त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
समय रैनाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत मागे झालेल्या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देत त्याची बाजू मांडली आहे. परंतु, यावेळी त्याने मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रिटींना रोस्ट केलं आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश खन्ना यांचा समावेश आहे. याचवेळी त्याने राखी सावंतचाही उल्लेख केला आहे. समय सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६च्या घरात असलेल्या राखी सावंतबद्दल नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात…
राखीबद्दल काय म्हणाला समय रैना
समय त्याच्या शोवर टीका झाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याचे व्हिडीओ डिलीट करायला सांगितलेलं असं म्हणाला आहे. यावेळी तो पोलिसांबद्दल बोलताना राखीचा उल्लेख करत म्हणाला, “मी युएसमध्ये होतो. जेव्हा मला मुंबई पोलिसांचा फोन आला आणि ते म्हणाले तुम्हाला सर्व एपिसोड डिलीट करावे लागतील. मी म्हटलं मी करणार नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मग त्यांनी माझ्या एडिटरला अटक केली. त्याने मला सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये २० पोलिस अधिकारी होते आणि ते सगळे एपिसोड बघत होते आणि यापूर्वी अशी भाषा कधी वापरण्यात आलीये का त्याचा तपास करत आहेत. मग मी ठरवलं की पोलिसांनी राखी सावंतचा एपिसोड पाहण्याआधी मीच सगळे व्हिडीओ डिलीट करतो. राखी सावंतचा एपिसोड जर पोलिसांनी पाहिला असता तर त्यांनी मला देशातून काढून टाकलं असतं.”
समयने या व्हिडीओमधून अमिताभ बच्चन यांनाही रोस्ट केलं आहे. समयने बिग बींच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये हजेरी लावलेली. त्यावेळचा किस्सा सांगत तो म्हणाला, “मी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये गेलो होतो. तेव्हा सभ्य वागण्याचा प्रयत्न केला. पण, माझ्या डोक्यात तेव्हासुद्धा वेडेवाकडे विचार आलेच होते ना”.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तो काय विचार करत होता याबद्दल म्हणाला, “सर तुम्ही इतक्या पोलिओच्या जाहिराती केल्या आहेत. तरीसुद्धा तुमच्या मुलाला त्याच्या पायावर का उभं करू शकला नाही? पण, मी नाही ना बोलून दाखवलं. तिथे मी काय बोललो की सर माझी आजी तुमची खूप मोठी चाहती आहे. खरंतर माझ्या आजीचं निधन होऊन ७ वर्षे झाली आहेत. पण, तुम्हाला असा आव आणावा लागतो. भारतात इंटरनेटवर तुम्ही खरं वागू शकत नाही. हाच खरा खेळ आहे आणि मला तो कळतो.”
