‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही मालिका आज जगातील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेचे आठवे सत्र येत्या १४ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जबरदस्त कथानक आणि उत्तम अभिनय ही या मालिकेची खास वैशिष्टय़े मानली जातात. परंतु त्याचबरोबर यात वापरले गेलेले अफलातून स्पेशल इफेक्ट्सही उल्लेखनीय आहेत. हॉलीवूड मनोरंजन संस्कृतीत व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा अ‍ॅनिमेशनचा वापर भारतीय चित्रपटांच्या तुलनेने खूप मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यामुळे हॉलीवूड चित्रपट निर्मात्यांकडे व्हिज्युअल इफेक्ट्सबाबत जितके ज्ञान आहे, तितके ज्ञान भारतीयांकडे नाही असा काहीसा गोड गैरसमज आपल्याकडे पसरवला जातो. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या २० वर्षांत हॉलीवूड सिनेक्षेत्रात तयार झालेल्या ‘द थ्री ऑफ लाइफ’, ‘मॅड मॅक्स’, ‘ग्रॅव्हिटी’, ‘अवतार’ यांसारख्या अनेक मोठय़ा चित्रपटांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर करण्यासाठी भारतीयांची मदत घेण्यात आली आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही आज जगातील सर्वात महागडी मालिका म्हणून ओळखली जाते. मात्र, ही मालिकादेखील भारतीय अ‍ॅनिमेटेड कलाकारांचा स्पर्श झाल्याशिवाय पूर्ण होऊ  शकलेली नाही.

‘गेम ऑफ थ्रोन्स’ ही ‘वेस्टोरॉस’ या साम्राज्याची कथा आहे. वेस्टोरॉसचे सर्वसाधारणपणे दोन भागांत विभाजन करता येते. उत्तरेकडे स्टार्क ऑफ विंटरफेल (रुल्स ऑफ नॉर्थ), ट्ली ऑफ रिव्हरन (रुल्स ऑफ रिव्हरलँड), अ‍ॅरेन ऑफ द एरी (रुल्स ऑफ व्हेल) आणि दक्षिणेकडे लॅनिस्टर ऑफ कॅस्टर्ली रॉक (रुल्स ऑफ द वेस्टरलँड), ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड (रुल्स ऑफ द स्टॉर्मलँड), ट्रेल ऑफ हायगार्डन (रुल्स ऑफ द रिच), मार्टेल ऑफ सन्सस्पेअर (रुल्स ऑफ ड्रोन) या सात राज्यांची मिळून ‘वेस्टोरॉस’ या साम्राज्याची निर्मिती झाली आहे. किंग्स लँडिंग ही या साम्राज्याची राजधानी असून या सात लहान राज्यांवर राज्य करणारा राजा ज्या सिंहासनावर बसतो त्याला ‘आयर्न थ्रोन’ असे म्हटले जाते. आणि या राज सिंहासनाभोवती ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेचे कथानक फिरत असते.

यांत दाखवलेल्या प्रत्येक राज्याची संस्कृती एकमेकांपेक्षा भिन्न आहे. शिवाय त्यांचे भौगोलिक वातावरणही भिन्न आहे. उदा. स्टार्क ऑफ विंटरफेल हे राज्य वर्षांचे १२ महिने बर्फाळलेले असते. तर दुसरीकडे ब्रॅथॉन ऑफ स्टॉम्र्स एंड हे राज्य आपल्या सहारा वाळवंटाप्रमाणे अगदी ओसाड आहे. यातील प्रत्येक राज्याची लढण्याची एक वेगळीच शैली आहे. त्याप्रमाणे त्यांची हत्यारेही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ही प्रचंड मोठी सांस्कृतिक विविधता एखाद्या मालिकेत तब्बल आठ वर्षे सातत्याने दाखवणे हे सर्वात मोठे आव्हान होते. आणि अभिमानाची बाब म्हणजे हे प्रचंड मोठे आव्हान भारतीयांनी स्वीकारले.

व्हीएफएक्स म्हणजे काय?

चलत्चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या इफेक्टला संक्षिप्तरीत्या ‘व्हीएफएक्स’ किंवा व्हिज्युअल इफेक्ट असे म्हणतात. व्हीएफएक्स म्हणजे कॉम्प्युटर किंवा सॉफ्टवेअरने तयार केलेल्या डिजिटल इमेजेसचा संच असतो. जो वास्तविकतेचा भास निर्माण करतो. आपल्याला कळणारही नाही अशा पद्धतीने व्हीएफएक्सचा वापर चित्रपट निर्माते करतात. एखादे दृश्य चित्रित करताना जर ते कॅमेऱ्यात चित्रित करणे अशक्य असेल, खर्चीक होत असेल किंवा धोकादायक असेल तर त्यासाठी व्हीएफएक्स हे तंत्रज्ञान वापरतात. मोठे बॉम्बस्फोट, जुन्या काळातील किंवा भविष्यकालीन सेट तयार करण्यासाठी, गाडय़ांचे स्टंट दाखवण्यासाठी, सुपर पॉवर दाखवण्यासाठी, विज्ञान कथा, अ‍ॅनिमेशन दाखवण्यासाठी व्हिज्युअल इफेक्टसचाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान फक्त चित्रपटापुरतं मर्यादित नसून व्हिडीओ गेममध्येही वापरलं जातं. जिथे जिथे व्हिडीओ किंवा चलत्चित्रे दिसतात अशा प्रत्येक ठिकाणी व्हीएफएक्स वापरलं जाऊ  शकतं. निर्माते डेव्हिड बेनिऑफ यांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील व्हिज्युअल इफेक्ट्सची जबाबदारी अमेरिकेतील ‘इंडस्ट्रियल लाइट अँड मॅजिक’ या कंपनीवर सोपवली. त्यानंतर लगेचच या कंपनीने आपले काम सुरू केले. मात्र, त्यांच्याकडे कुठल्याच नवीन कल्पना नसल्यामुळे त्यांचे काम दिग्दर्शक डेव्हिड न्यूटर यांना काही केल्या पसंत पडत नव्हते. मग यावर उपाय म्हणून नवीन कल्पना मिळवण्यासाठी त्यांनी एक अ‍ॅनिमेशन स्पर्धा आयोजित केली होती. जगभरातील लाखो कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. आणि आश्चर्याची बाब म्हणजे या लाखोंपैकी ८०० भारतीय कलाकार या स्पर्धेत उत्तीर्ण झाले. त्यांच्या अद्ययावत कल्पना ‘इंडस्ट्रियल लाइट अँड मॅजिक’ कंपनीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी बेन मॉरिस यांना प्रचंड आवडल्या. पुढे त्यांच्या मार्फतच ‘गेम ऑफ थ्रोन्स’चे चित्रीकरण करण्यात आले. दरम्यान मालिकेतील अक्राळ विक्राळ राक्षस आणि प्राणी तयार करण्यासाठी ‘विंडलास स्टीलक्राफ्ट’ या भारतीय अ‍ॅनिमेशन कंपनीची मदत घेण्यात आली. या कंपनीने याआधी ‘बाहुबली’, ‘रा. वन’, ‘रोडसाइड रोमियो’, ‘मख्खी’ यांसारख्या अनेक मोठय़ा चित्रपटांसाठी व्हिज्युअल इफेक्ट्स तयार करण्याचे काम केले आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारतीय पाश्चात्त्य देशांपेक्षा कमी नाहीत हे लक्षात येते.