यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपटांचा बोलबोला आहे. भारतीय चित्रपट केवळ येथे उपस्थित प्रेक्षकांनाच भुरळ घालत नसून, परीक्षकांच्यासुद्धा खास पसंतीस उतरत आहेत. ‘डब्बा’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘अगली’ सारख्या चित्रपटांमुळे समकालीन भारतीय चित्रपटांमध्ये केवळ नाच-गाण्याशिवाय बरेच काही आहे, हा विश्वास आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना देण्यात यशस्वी झाले आहेत. ‘हॉलीवूड रिपोर्टर’ आणि ‘वेरायटी’ सारख्या प्रसारमाध्यमांनी भारतीय चित्रपटांची खूप प्रशंसा केली आहे.
दिग्दर्शक अमित कुमार यांच्या ‘मान्सून शूटआऊट’ या चित्रपटाची प्रशंसा करतांना ‘हॉलीवूड रिपोर्टर’ने लिहिले आहे की, या चित्रपटातील भारतीय पोलिस आणि गॅंगस्टर यांच्यामधील कथेने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चित्रपटाचे स्वरूप यशस्वीपणे साकारले आहे.