छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो इंडियन आयडलमध्ये सहभागी झालेल्या २८ वर्षीय स्पर्धकाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हा स्पर्धक सोनसाखळी चोरीच्या आणि सशस्त्र दरोड्याच्या १०० प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. हा प्रकार पहिल्यांदा घडलेला नाही. २०१७पासून हे सर्व सुरु होते. दिल्लीमधील मोती नगर परिसरात पोलीस तपास करत होते. त्यावेळी त्यांना एक संशयीत व्यक्ती गाडी घेऊन जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पाहिले आणि थांबून त्याची चौकशी केली. तेव्हा त्या व्यक्तीने गाडी किर्ती नगर परिसरातून चोरी केल्याची माहती समोर आली.
तसेच चौकशी दरम्यान आरोपीने उत्तर दिल्लीमधील काही परिसरातून मोबाईल फोन आणि अडीच किलो सोने चोरल्याची कबूली दिली. त्याचबरोबर चाकू आणि बंदूकीचा धाक दाखवून काही मोटारसायकल चोरी केल्याची देखील कबूली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने दिल्लीमधील सोनसाखळी चोरीच्या आणि सशस्त्र दरोड्याच्या १०० प्रकरणांमध्ये सहभागी असल्याची कबूली दिली.
आरोपी दिल्लीमधील उत्तम नगर परिसरातील विकास नगरमध्ये राहणार असून त्याचे नाव सूरज उर्फ फायटर आहे. सूरजने दिल्ली यूनिवर्सिटीमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे. २००८मध्ये त्याने इंडियन आयडल सिझन ४मध्ये सहभाग घेतला होता. तो टॉप ५० स्पर्धकांमध्ये निवडला गेला होता.