फोर्ब्स मॅगझीनने नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यंदाची यादी जाहीर केली आहे. ‘फोर्ब्स २०२६’ च्या या अब्जाधीशांच्या यादीत जगातील ४००० व्यक्तींचा समावेश असून त्यात भारताचे ३०० हून अधिक लोक आहेत. यामध्ये कला आणि मनोरंजन क्षेत्राशी संबंधित काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. यामध्ये एका मीडिया सम्राटाने सलग चौथ्या वर्षी ‘भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माता’ होण्याचा मान पटकावला आहे. या अब्जाधीशाचं नाव आहे कलानिधी मारन.
कलानिधी मारन हे सध्या भारतातील सर्वात श्रीमंत चित्रपट निर्माते आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, त्यांची संपत्ती तब्बल २.८ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास २६,००० कोटी रुपये इतकी आहे. त्यांच्या या संपत्तीत सर्वात मोठा वाटा ‘सन पिक्चर्स’ या प्रॉडक्शन हाऊसचा आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या ‘सन पिक्चर्स’ने एंधिरन, पेट्टा, बीस्ट, जेलर आणि कुली यांसारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये रजनीकांत आणि अल्लू अर्जुन यांचा ‘जेलर’ आणि ॲटलीचा आगामी सिनेमा, अशा दोन बड्या सिनेमांचा समावेश आहे.
शाहरुख खान, आदित्य चोप्रा व करण जोहरच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती
कलानिधी मारन यांनी बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत निर्माते रोनी स्क्रूवाला यांना मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या यादीत रोनी स्क्रूवाला यांचेही नाव आहे. त्यांची संपत्ती १.६ अब्ज डॉलर्स आहे. मारन यांची संपत्ती २६,००० कोटी रुपये आहे. हा संपत्तीचा आकडा शाहरुख खान (७,५०० कोटी), आदित्य चोप्रा (७,७०० कोटी) आणि करण जोहर (२,००० कोटी) यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षाही जास्त आहे.
कलानिधी मारन यांचे व्यवसाय
कलानिधी मारन हे माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन यांचे चिरंजीव आहेत. कलानिधी यांनी ८० च्या दशकात आपल्या कौटुंबिक व्यवसायापासून सुरुवात केली होती. १९९३ मध्ये त्यांनी ‘सन टीव्ही नेटवर्क’ सुरू केले. फोर्ब्सनुसार, आता या नेटवर्कची ३७ चॅनेल्स आहेत. त्यांच्या इतर व्यवसायांमध्ये वर्तमानपत्र, रेडिओ, DTH आणि तीन क्रिकेट संघांचा समावेश आहे. यामध्ये आयपीएलमधील ‘सनरायझर्स हैदराबाद’, SAT20 लीगमधील ‘सनरायझर्स इस्टर्न केप’ आणि द हंड्रेडमधील ‘सनरायझर्स लीड्स’ हे तीन संघ आहेत.
कलानिधी मारन यांची पत्नी कावेरी सन टीव्ही नेटवर्कमध्ये कार्यकारी संचालक आहेत. तर त्यांची मुलगी काव्या मारन ही त्यांच्या तिन्ही क्रिकेट फ्रँचायझींची सीईओ आहे.
