|| रेश्मा राईकवार

सलमान खानच्या प्रत्येक चित्रपटात जशी त्याची भाईगिरी महत्त्वाची असते, तशी अक्षयकुमारच्या प्रत्येक चित्रपटात देशभक्ती महत्त्वाची असते. त्यामुळे देशभक्ती हा आपला हुकूमी एक्का कायम ठेवत अक्षयकुमारने बेल बॉटमचा घाट घातला आहे. एका रंजक कथेला देशभक्तीचा मुलामा न देता केलेला तितकाच मनोरंजक चित्रपट म्हणून रणजीत एम. तिवारी दिग्दर्शित ‘बेल बॉटम’चा उल्लेख करता येईल.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
rbi commemorative coins
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

बेल बॉटम ही सत्तरच्या दशकातील फॅशनची ठळक ओळख. बेल बॉटम पॅन्ट ही त्या काळी तारांकितांची प्रचलित फॅशन होती. इथे मात्र त्याचा उल्लेख ‘रॉ’च्या एका अधिकाऱ्याचे गुप्त नाव म्हणून येतो. आपल्या चित्रपटाच्या नायकाचे गुप्त नाव ‘बेल बॉटम’ आहे. त्याची आणि आपली ओळख चित्रपट सुरू झाल्या झाल्या काही मिनिटांत होते. त्याचा भूतकाळही लगोलग आपल्याला समजतो. आईवर प्रेम असलेल्या, धडपड्या, अत्यंत हुशार अशा अंशुलला ‘रॉ’ हेरते. त्याचा भूतकाळ त्याच्यासाठी कारणीभूत असतो, तो काय हे चित्रपटात पाहायला हवं. ऐंशीच्या दशकात देशभरात अनेक दहशतवादी, फुटीर संघटनांनी डोकं वर काढलं होतं. त्या काळात आपल्याकडे विमान अपहरणाच्या घटनाही वाढल्या होत्या. भारतात तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांना सहीसलामत सोडवून परत आणण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने या संघटनांना हाताशी धरून विमान अपहरणाची कारस्थाने रचली होती, अशी या चित्रपटाची कथा सांगते. १९८४ साली झालेल्या अशाच विमान अपहरण प्रसंगात दहशतवाद्यांना सोडवण्याच्या वाटाघाटी करण्यास भारत सरकारने नकार दिला. विमान अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यातही ‘रॉ’ला आणि पर्यायाने सरकारला यश मिळाले. आणि हा सगळा प्रसंग यशस्वी करण्यात ज्याचा वाटा होता तो आहे आपला नायक बेल बॉटम.

देशभक्तीचा बडेजाव न करता बेल बॉटम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पार पाडलेली कामगिरी दिग्दर्शक तिवारी यांनी संयत पद्धतीने रंगवली आहे. भावनिक नाट्याला फाटा देत हलक्याफुलक्या पद्धतीने हा चित्रपट केला असल्याने तो निखळ मनोरंजन करतो. बॉलीवूडपट असल्याने तो नाच-गाण्यापासून दूर राहू शकत नाही. अंशुल आणि त्याची पत्नी यांच्यातले काही मोजके प्रेमप्रसंग खुलवण्यासाठी गाण्यांचा वापर केला गेला आहे. वाणी कपूरला याही चित्रपटात फारसे काही काम नाही, पण तिच्या वाट्याला आलेल्या छोटेखानी भूमिकेतला तिचा वावरही आनंददायी आहे. अभिनेत्री लारा दत्ताने यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. इंदिराजींच्या भूमिकेत लारा आहे हे सांगूनही पटणार नाही इतक्या प्रभावी पद्धतीने मेकअप करण्यात आला आहे. लाराने आपल्या देहबोलीतून आणि अभिनयातून इंदिरा गांधी यांची अप्रतिम भूमिका केली आहे. ‘रॉ’चे प्रमुख म्हणून अभिनेता आदिल हुसैन यांनी लक्ष वेधून घेतले आहे. अक्षयकुमारनेही त्याच्या नेहमीच्या शैलीत बेल बॉटमची व्यक्तिरेखा रंगवली आहे. उत्तम कलाकार आणि उत्तम पटकथेच्या जोरावर दिग्दर्शक रणजीत तिवारी यांनी कुठेही भडक नाट्याला थारा न देता चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यामुळे करोनाकाळात ज्या पद्धतीचे मनोरंजन प्रेक्षकांना हवे आहे ते देण्यात ‘बेल बॉटम’ हा चित्रपट यशस्वी ठरतो.

बेल बॉटम

दिग्दर्शक – रणजीत एम तिवारी

कलाकार – अक्षयकुमार, वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी, आदिल हुसैन, डेन्झिल स्मिथ, डॉली अहलुवालिया.