scorecardresearch

“बलात्कारासारख्या घटना… ” प्रसिद्ध दिग्दर्शकाने समाजातील ज्वलंत विषयावर केला खुलासा

राघव गुप्ता हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रफी मेहमूद हे छायाचित्रकार म्हणून आहेत.

“बलात्कारासारख्या घटना… ” प्रसिद्ध दिग्दर्शकाने समाजातील ज्वलंत विषयावर केला खुलासा
bollywood director siya film

बॉलिवूडमध्ये सध्या ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची चर्चा आहे दुसरीकडे ‘विक्रम वेधा’ सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकची चर्चा आहे. गेल्या काही वर्षात बॉलीवूडमध्ये संजयक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट येत आहेत. ‘आर्टिकल १५’, ‘पिंक’, सारख्या चित्रपटातून महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाष्य केले होते. ‘मसान’, ‘न्यूटन’ सारखे वेगळ्या धाटणीचे चित्रपट निर्मिती करण्याऱ्या दृश्यम फिल्म्सने ‘सिया’ नावाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. याच चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष मुंद्रा यांची मुलखात आमच्या प्रतिनिधीने घेतली आहे. या मुलाखतीत ते मनमोकळेपणाने चित्रपटाबद्दल बोलले आहेत.

प्रश्न : चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, याआधी निर्मिती क्षेत्रात होतात पहिल्यांदाच दिग्दर्शकांच्या भूमिकेत आहात कस वाटतंय?

मला खूपच आनंद होत आहे, मला आधीपासून इच्छा होती दिग्दर्शनात पदार्पण करावे, चांगल्या कथेच्या शोधात होतो आणि अखेर ही कथा माझ्या समोर आली आहे.

प्रश्न : चित्रपटाची कथा बलात्कारवर आधारित आहे, पहिल्याच चित्रपटात असा विषय दाखवण्याचं धाडस तुम्ही करत आहात, याबद्दल काय सांगाल?

आम्ही अशाच विषयांच्या शोधात होतो जे लोकांना बघायला आवडत नाही, ज्या व्यक्तीसोबत अशा घटना घडतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना कशा प्रकारे गोष्टीना सामोरे जावे लागते. न्यायाच्या मार्गावर चालताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांच्यावर दबाव टाकण्यात येतो. माणुसकीच्या नात्याने आपण या समाजाच्या भाग आहोत त्यामुळे आपण अशा घटनांच्या बाबतीत जागरूक असायला हवे. त्यांच्या कठीण काळात पीडित परिवाराच्या कुटुंबियांना मदतीची गरज असते. जो पर्यंत त्यांचा संघर्ष आपण बघत नाही तो पर्यंत आपण यात सहभागी होऊ शकत नाही.

रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘या’ हिट चित्रपटाला मागे टाकले

प्रश्न : आपल्या देशात स्त्रियांवरील अनेक अत्याचार होत असतात, खूप कमी जणींना न्याय मिळतो यावर तुमचं काय मत आहे?

महिलांच्या बाबतीत अत्याचार हा केवळ आपल्या देशात नव्हे तर जगभरात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या देशाची लोकसंख्या, आपल्याकडील न्यायव्यवस्थेतमुळे अनेकवर्ष न्याय मिळण्यासाठी वेळ लागतो. वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागत असल्याने पीडित आणि त्याचे कुटुंबीयांच्यातील शक्ती निघून जाते. अगदी काही केसेस आता फास्टट्रॅक कोर्टात चालवल्या जातात. यातील प्रक्रियेमध्ये बदल करण्यात यायला हवेत. या चित्रपटात मी केवळ या घटना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही सामाजिक संदेश देण्याचा माझा विचार नाही.

प्रश्न :आपले आधीचे मसान, न्यूटन सारखे चित्रपट सामाजिक मुद्यांवर होते, तुम्हाला अशाच धर्तीवरचे चित्रपट बनवण्यास आवडतात का? तद्दन व्यावसायिक चित्रपट तुम्ही करणार का?

हा चित्रपट देखील व्यावसायिकच आहे, चित्रपट हा एक असा व्यवसाय आहे जिथे पैसे आणि कला यांचे मिश्रण आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपण उत्तमरीत्या पडद्यावर मांडता यायला हव्या.

प्रश्न : या चित्रपटात आताच आघाडीचा अभिनेता विनीत कुमार सिंग दिसत आहे, या अभिनेत्याबद्दल काय सांगाल?

खूप छान अनुभव आहे, तो मस्त कलाकार आहे. नव्या जमान्याचा ‘नसरुद्दीन शाह’ आहे असं मी म्हणेन, आम्ही आधीपासूनचे मित्र आहोत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. या चित्रपटासाठी मी त्याला विनंती केली होती. या चित्रपटात त्याने अप्रतिम काम केले आहे.

प्रश्न : प्रेक्षकांनी हा चित्रपट का पहावा? काय सांगाल?

आम्ही एक खूप चांगला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात कोणती शिवी नाही, दारू सिगरेट अशा कोणत्या गोष्टी दाखवल्या नाहीत. समाजाला आरसा दाखवणारा चित्रपट आम्ही बनवला आहे. मी प्रेक्षकांना हेच सांगेन की हा चित्रपट नक्की बघा कारण यातील घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि आपल्याला त्याची माहिती देखील नसते. तसेच ज्या स्त्रियांच्या बाबतीत अशा घटना घडतात त्यांचे दुःख, त्रास आपल्याला कळायला हवा. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे.

प्रश्न : भविष्यातील चित्रपटांबद्दल काही सांगू शकाल?

ज्या कथा दाखवू त्या अगदी मनापासून दाखवू, आपल्या आसपास घडणाऱ्या घटना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. एका चित्रपटाचे काम आम्ही नुकतेच पूर्ण केले आहे. आणखीन दोन तीन चित्रपटांवर काम करणे सुरु आहे.

सिया चित्रपटात पूजा पांडे, विनीत कुमार सिंग हे मुख्य कलाकार दिसून येत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर १. ५२ मिनिटांचा आहे जो अंगावर काटा आणणारा आहे. मनिष मुंद्रा यांनी लेखनाची देखील जबाबदारी पार पाडली आहे. राघव गुप्ता हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. रफी मेहमूद हे छायाचित्रकार म्हणून आहेत. १६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या