कोलकात्यातील इडन गार्डन्स मैदानावर शाहरुखच्या केकेआर या संघाला चाहत्यांचा पाठिंबा असतानाही घरच्याच मैदानावर या संघाला विजय मिळवता आला नाही. आयपीएलच्या ११ व्या हंगामामध्ये मुंबई इंडियन्स आणि केकेआर या संघांदरंम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यामध्ये यजमान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या संघाने दिलेल्या २१० धावांचा पाठलाग करताना कोलकात्याच्या संघाला सर्वबाद १०८ धावांवर गाशा गुंडाळावा लागला.

मुंबईच्या फलंदाजी आणि गोलंजादाजीचं या सामन्यात बरंच कौतुक करण्यात आलं. प्रत्येक खेळाडूनने मुंबईच्या संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पण, कोलकाता संघाची मालकी असणाऱ्या अभिनेता शाहरुख खानला मात्र संघाची हार जिव्हारी लागली आहे. त्याने केलेलं हे ट्विट पाहून ही बाब लगेचच लक्षात येतेय.

आपल्या संघाला मिळालेल्या पराभवानंतर शाहरुखने एक ट्विट करत चाहत्यांची माफी मागितली. ‘खेळामध्ये खिलाडूवृत्तीच सर्वाधिक महत्त्वाची असते. हरणं किंवा जिंकण्यातून ती दिसून येत नाही. पण, संघाचा मालक म्हणून आजच्या आमच्या संघाच्या निरुत्साही खेळाबद्दल मी चाहत्यांची माफी मागतो’, असं ट्विट त्याने केलं. शाहरुखच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर अनेकांनीच केकेओरच्या संघातील काही मोठ्या खेळाडूंनी आतातरी त्यांच्या खेळीचं प्रदर्शन करावं अशी आशा व्यक्त केली आहे. हर्षा भोगले यांनीही ट्विट करत उत्थप्पा आणि रसेल या खेळाडूंनी आणखी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं अशी इच्छा व्यक्त केली होती.

वाचा : VIDEO: पहिल्या प्रेमाचा उल्लेख करताना धोनी मध्येच थांबला…म्हणाला बायकोला काहीही सांगू नका

मुंबई आणि कोलकात्याच्या संघामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये इशान किशनच्या खेळीने अनेकांची मनं जिंकली. अवघ्या २१ चेंडूंमध्ये धमाकेदार फलंदाजी करत किशनने ५ चौकार आणि ६ षटकार ठोकत कोलकात्याच्या गोलंदाजांच्या नकी नऊ आणले. या विजयासोबतच आयपीएल ११ च्या गुणतालिकेत मुंबईच्या संघाने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.