मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे हैदराबादला हातात आलेल्या सामन्यावर पाणी सोडावं लागलं. बंगळुरुच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी हैदराबादच्या डावाला खिंडार पाडत सामन्यात दमदार पुनरागमन केलं. एका क्षणाला हातातून गमावलेला सामना बंगळुरुने १० धावांनी जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्याच सामन्यात मिळवलेल्या या विजयावर विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने आनंद व्यक्त केला आहे. “विजयाची सुरुवात झाली आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून तिने RCB मधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. तिची ही खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण…

अवश्य पाहा – “बॉलिवूडमध्ये ड्रग्स कोणी भरवत नाही”; कंगनाच्या आरोपांना श्वेता त्रिपाठीचं प्रत्युत्तर

बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. कर्णधार वॉर्नर धावबाद होऊन माघारी परतला. यानंतर मनिष पांडे आणि जॉनी बेअरस्टो जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानात स्थिरावल्यानंतर फटकेबाजी सुरुवात केली. पांडे-बेअरस्टो जोडी मैदानात चमत्कार घडवणार असं वाटत असतानाच पांडे माघारी परतला. यानंतरही बेअरस्टोने एक बाजू लावून धरत फटकेबाजी सुरु ठेवली. बंगळुरुच्या गोलंदाजांचा समाचार घेत बेअरस्टोने ४३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६१ धावा केल्या. युजवेंद्र चहलने एकाच षटकात बेअरस्टो आणि विजय शंकरला माघारी धाडत हैदराबादला धक्का दिला.

यानंतर हैदराबादच्या डावाला गळती लागली. मधल्या फळीतला एकही फलंदाज मैदानावर फारसा स्थिरावू शकला नाही. अनेक फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकल्यामुळे बंगळुरुच्या संघाला विजय सोपा झाला. युजवेंद्र चहलने ३ बळी घेत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्याला नवदीप सैनी आणि शिवम दुबे यांनी २-२ तर स्टेनने १ बळी घेत चांगली साथ दिली.