मुंबई : एरव्ही चित्रपट निर्माते – दिग्दर्शक नवीन चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सणवार-सुट्टीचा हंगाम यांच्या प्रतीक्षेत असतात. साधारणपणे शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या सुट्टीत मराठी, हिंदीबरोबरच मोठे दाक्षिणात्य चित्रपट, बहुचर्चित हॉलीवूडपट प्रदर्शित होत असतात. मात्र, यंदा अमेरिका-इस्रायल यांनी इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाचा परिणाम हॉलीवूडपट आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या प्रदर्शनावर झालेला पाहायला मिळतो आहे. एकतर ‘धुरंधर’सारखा मोठा हिंदी चित्रपट मार्चच्या मधल्या आठवड्यात प्रदर्शित होत असल्याने त्या दोन आठवड्यांत अन्य कोणताही हिंदी किंवा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाहीये. शिवाय, एप्रिल आणि मे महिन्यात हिंदी-मराठी मिळून केवळ १७ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
चित्रपट प्रदर्शनाचा दुष्काळ खरंतर मार्चपासूनच सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. मार्च महिन्यात मोजून तीन ते चार नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर मराठीतही दोनच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हा दहावी-बारावीच्या परीक्षांचा महत्त्वाचा काळ असल्याने चित्रपट प्रदर्शनाचा आकडा तुलनेने कमीच असतो असे म्हणावे तर युद्धाचा परिणामही चित्रपटांच्या प्रदर्शनावर जाणवू लागला आहे.
१९ मार्चला आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ या चित्रपटाबरोबरच दाक्षिणात्य अभिनेता यश याचा ‘टॉक्सिक’ हा बहुचर्चित चित्रपटही प्रदर्शित होणार होता. मात्र, युद्धामुळे सध्या देशाला बसलेला गॅस आणि इंधन तुटवड्याचा फटका आणि एकूणच अस्थिर वातावरण यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘टॉक्सिक’ चित्रपटाचे प्रदर्शन जून महिन्यापर्यंत पुढे ढकलले आहे. चित्रपट प्रदर्शनाचा हा दुष्काळ इथवरच थांबलेला नाही. एप्रिल आणि मे महिन्यात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ‘दृश्यम ३’ हा मल्याळम चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अभिनेता मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘दृश्यम’ चित्रपट शृंखला आधीच यशस्वी ठरली असल्याने तिसऱ्या चित्रपटाला प्रेक्षकवर्ग मिळणार, याबद्दल निर्माते आश्वस्त आहेत. हिंदी ‘दृश्यम ३’ पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांना ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात हिंदीत केवळ अक्षय कुमारचा ‘भूत बंगला’ हा एकमेव मोठा आणि बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मूळ ‘भुलभुलय्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासह त्या चित्रपटातील कलाकारांना पुन्हा एकत्र आणणारा ‘भूत बंगला’ हा खऱ्या अर्थाने नामांकित बहुकलाकारांची मांदियाळी असलेला चित्रपट आहे.
मराठीतही एप्रिल महिन्याची सुरुवात अशाच नामांकित कलाकारांच्या भूमिका असलेल्या बहुचर्चित चित्रपटाने होणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित, ‘सुपर डुपर’ हा झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला चित्रपट ३ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले ही नवी जोडी पाहायला मिळणार असून निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषीकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आदी कलाकार मंडळी आहेत. या जोडीला प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांचा ‘सखे गं साजणी’ हा चित्रपटही त्याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. पुन्हा १७ एप्रिलला पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने आदी कलाकारांचा ‘सालबर्डी’ हा रमेश साहेबराव चौधरी दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याशिवाय, ‘फुला’ हा अभिषेक जावीर दिग्दर्शित चित्रपट आणि ‘लाडकी बहीण’ हा स्मिता तांबे, उषा नाडकर्णी, उषा नाईक, सुरेखा कुडची, रुक्मिणी सुतार अशा अभिनेत्रींना एकत्र आणणारा शीतल शिंदे दिग्दर्शित चित्रपट असे मोजून पाच मराठी चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहेत.
मे महिन्याची सुरुवातच १ मे रोजी रितेश देशमुख अभिनित, दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या एकाच वेळी हिंदी आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या भव्य चित्रपटाने होणार आहे. विशेष म्हणजे ‘राजा शिवाजी’ वगळता एकही हिंदी-मराठी मोठा चित्रपट मे महिन्यात प्रदर्शित होणार नाही. जुनैद खान-साई पल्लवी अशी वेगळी जोडी असलेला आमिर खान प्रॉडक्शन्सचा ‘एक दिन’, मुदस्सर अझीझ दिग्दर्शित ‘पती, पत्नी और वोह दो’नामक आयुषमान खुराणा ,सारा अली खान, वामिका गब्बी अशा कलाकारांना एकत्र आणणारा चित्रपट आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ हा बॉबी देओल, सान्या मल्होत्रा, जितेंद्र जोशी अशा वेगळ्या कलाकार मंडळींचा चित्रपट हे त्यातल्या त्यात चांगले म्हणता येतील असे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
मराठीतही ‘पिक्चर बॉईज’, ‘बाप्या’ हे दोन चित्रपट मिळून मे महिन्यात फक्त तीनच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. गेल्या वर्षी फक्त मराठीत उन्हाळी सुट्टीच्या हंगामात २४ चित्रपट प्रदर्शित झाले होते. हा आकडा हिंदीत प्रदर्शित झालेल्या १६ चित्रपटांपेक्षाही मोठा आहे. त्यातही गेल्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘आता थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ या चित्रपटांनी चांगली कमाई केली होती. त्या तुलनेत या सुट्टीत जणू मराठी चित्रपट गायबच असल्यागत अवस्था आहे. युद्ध पुढच्या काही दिवसांत थांबले नाही तर या वर्षीच्या उन्हाळी सुट्टीत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांच्या या यादीत आणखी घट होऊ शकते, असा अंदाजही ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
