scorecardresearch

CID चा नवीन सीझन येणार का? शिवाजी साटम म्हणतात…

सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न या व्यक्तिरेखेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली.

मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत एक नावाजलेला चेहरा म्हणून अभिनेते शिवाजी साटम यांना ओळखले जाते. सोनी वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सीआयडी’मध्ये अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न ही भूमिका साकारली होती. अभिनयाच्या जोरावर शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्न ही व्यक्तिरेखा अजरामर केली होती. सीआयडीमधील ‘कुछ तो गडबड है’ या डायलॉग ऐकला तर आजही शिवाजी साटम यांचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. दरम्यान शिवाजी साटम यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्याकडे आता कोणतेही काम नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

शिवाजी साटम यांनी सीआयडी व्यतिरिक्त ‘वास्तव’, ‘नायक’, ‘सूर्यवंशम’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या जबरदस्त अभिनयामुळे आजही ते चर्चेत असतात. सीआयडीमधील एसीपी प्रद्युम्न या व्यक्तिरेखेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. विशेष म्हणजे आजही त्यांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी एसीपी प्रद्युम्न या नावाने ओळखले जाते.

शिवाजी साटम यांनी नुकतंच ‘हिंदुस्तान टाईम्सला’ मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, “मला आता प्रचंड काम मिळत आहे, असे मी म्हणू शकत नाही. जर माझ्याकडे काम नसेल तर मी नाहीच म्हणेन. माझ्याकडे आतापर्यंत अनेक रोल आले आहेत, मात्र ते फार काही खास नाहीत. मी मराठी रंगभूमीतील आहे आणि मी माझ्या आयुष्यात फक्त अशाच प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे ज्याचा मला आनंद होतो. आजकाल एखादे अधिक सशक्त पात्रं लिहिले जात नाही, ही माझ्यासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे. त्यामुळे हे सर्व बाजूंनी नुकसान आहे.”

“मला काम मिळत नसल्याने घरी बसावे लागते. याचा मला कंटाळा आला आहे. त्यासोबतच एक अभिनेता म्हणून मला माझ्या कामाची उणीवही भासत आहे. आजही प्रेक्षक चांगले काम आणि चांगल्या कलाकारांची आठवण काढतात. आज मला जे काही छोटे काम मिळत आहे, तिथे मला पुन्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिका मिळत आहेत. पण आता मला अशा प्रकारची भूमिका साकारायची नाही, जी गेल्या २० वर्षांपासून मी करत आहे,” असेही ते म्हणाले.

या मुलाखतीत शिवाजी साटम यांना सीआयडीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. ‘गेल्या अनेक महिन्यांपासून सीआयडीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरु आहे, हे खरं आहे का? त्यात तुम्ही पुन्हा एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारणार का?’ असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.

Video: तलवारीने केक कापल्यामुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल, नेटकरी संतापले

त्यावर उत्तर देताना शिवाजी साटम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून सीआयडीचे निर्माते वेगळ्या प्रकारे हा शो पुन्हा सुरु करण्याबद्दल बोलत आहेत. याबद्दल चर्चाही सुरु आहेत. मात्र अद्याप यात कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही. त्यामुळे सध्या तरी हे सर्व तात्पुरत्या स्वरुपाचे असल्याचे दिसत आहे. तसेच जर उद्यापासून सीआयडीचा नवा सीझन सुरु झाला तर मी लगेचच एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारण्यासाठी तयार होईन. मला ही व्यक्तिरेखा साकारताना अजिबात कंटाळा आलेला नाही. त्याउलट आता घरी राहून कंटाळा आला आहे,” असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is cid coming back with a new season shivaji satam aka acp pradyuman reveals nrp

ताज्या बातम्या