Isha Ambani Met Gala 2026 Look: फॅशन जगतातील सर्वात मोठा सोहळा ‘मेट गाला’ यावर्षीही सेलिब्रिटींची हटके फॅशन, स्टाईल आणि दिग्गजांच्या उपस्थितीमुळे चर्चेत आहे. या भव्य कार्यक्रमात जगभरातील मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली. न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026) या भव्य सोहळ्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ईशा अंबानीने आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना थक्क केले आहे. भारतीय हस्तकला आणि आधुनिक फॅशनचा मिलाफ साधत ईशाने यावेळी ‘स्वदेश’च्या कारागिरांनी तयार केलेली अस्सल सोन्याच्या तारांची साडी परिधान केली होती. या लूकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा ब्लाउज, जो नीता अंबानी यांच्या वैयक्तिक कलेक्शनमधील आहे. या ब्लाउजवर हैदराबादच्या निजामांच्या ऐतिहासिक ‘सरपेच’ दागिन्याचा वापर करण्यात आला असून, हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मोगऱ्याच्या गजऱ्याचे आधुनिक ‘हेअर स्कल्पचर’ माळले होते.
ईशा अंबानीचा लूक
ईशा अंबानीचा हा लूक म्हणजे साडीकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन असून हस्तकला आणि परंपरेचा संगम आहे. ही साडी भारतातील समृद्ध वस्त्रकलेचा वारसा दाखवते. यामध्ये हाताने केलेले पेंटिंग आणि भरतकाम यांचा वापर करून साडीला एका शिल्पाप्रमाणे रूप देण्यात आलंय.
‘स्वदेश’च्या निष्णात कारागिरांनी अस्सल सोन्याच्या तारांचा वापर करून ही साडी तयार केली आहे. या साडीवर मऊ सोनेरी आणि नैसर्गिक रंगांमध्ये हाताने रंगवलेली ‘पिचवाई’ शैलीतील चित्रे काढण्यात आली आहेत.
नीता अंबानींच्या खास कलेक्शनमधील ब्लाउज
या साडीवरचा ब्लाउज हिरे आणि धातूच्या ‘झरदोजी’ भरतकामाने तयार करण्यात आलाय. विशेष म्हणजे, हा ब्लाउज ईशाची आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक कलेक्शनमधला आहे. यातून भारतीय कारागिरीचा वारसा दिसून येतो. या ब्लाउजच्या मागील बाजूस एक ऐतिहासिक ‘सरपेच’ लावण्यात आला आहे, जो एकेकाळी हैदराबादच्या निजामांच्या कलेक्शनचा भाग होता.
मोगऱ्याच्या गजऱ्याचा कलात्मक अविष्कार
ईशाचा लूक पूर्ण करण्यासाठी केसांमध्ये मोगऱ्याच्या फुलांपासून प्रेरित एक हेअर स्कल्पचर वापरण्यात आले. हे पारंपरिक मोगऱ्याच्या गजऱ्याचे एक आधुनिक रूप होते. ब्रुकलिनमधील कलाकार सौरभ गुप्ता यांनी कागद, तांबे आणि पितळ यांचा वापर करून तब्बल १५० तासांच्या मेहनतीतून हे हाताने तयार केलंय.
ईशा अंबानीची हटके हँडबॅग
ईशा अंबानीच्या हँडबॅगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मेट गाला कार्यक्रमाच्या संकल्पनेला साजेशी हँडबॅग सुबोध गुप्ता यांनी तयार केली. जाळीदार बॅगमध्ये आंब्याचे शिल्प ठेवण्यात आले.
