Actor Isha Koppikar Video on Andhbhakt: देशातील लोक कोणत्या राजकीय पक्षाला किंवा विचारधारेला पाठिंबा देता, कुणाची बाजू उचलून धरतात, यावरून त्यांना विविध नावे दिली जातात. उजव्या विचारांना पाठिंबा देणारे, डाव्यांची पाठराखण करणारे किंवा इतर विचारधारेच्या लोकांसाठी विशिष्ट विशेषणे वापरली जातात. कधी त्यांना हिणवण्यासाठी किंवा त्यांच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी अशी विशेषणे वापरणे आता सामान्य झाले आहे. अंधभक्त हे त्यातीलच एक विशेषण. शक्यतो पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला पाठिंबा देणाऱ्यांना हे विशेषण जोडले जाते, असे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मतांवरून दिसते. मात्र आता मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरने पुढे येत “होय, मी अंधभक्त आहे”, असे सांगून टाकले आहे. त्याची कारणीमीमांसाही तिने दिली आहे.
बॉलिवूडची अभिनेत्री ईशा कोप्पीकरने मंगळवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तिने स्वतःला अभिमानाने अंधभक्त म्हटले आहे. ईशाने दावा केला की, तिची अंधभक्ती कोणत्या एका पक्षासाठी नाही तर देश ज्याप्रकारे बदलत आहे, त्याचा तिला अभिमान वाटतो. देशाने आपल्यासाठी काय केले, हा प्रश्न विचारणे थांबवा, असे आवाहनही तिने या व्हिडीओत केले. याउलट देशासाठी काय योगदान देता येईल, याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे ईशा कोप्पीकर म्हणाली.
ईशाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती सुरुवातीलाच म्हणते, “हो, मी अंधभक्त आहे. जर भारतावर प्रेम करणे, आपल्या देशावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या प्रगतीची इच्छा बाळगणे, ही भक्ती असेल तर मी भक्त आहे. अंधभक्त असल्याचा मला अभिमान आहे. माझी भक्ती कोणत्याही राजकीय पक्षावर नाही, तर माझ्या देशाप्रती आहे. राष्ट्र प्रथम हे माझे तत्व आहे. मी सरकारला प्रश्न विचारू शकते आणि त्यांच्या धोरणांशी असहमतही असू शकते. तरीही माझ्या देशावर मी प्रेम करू शकते.”
ईशा कोप्पीकर पुढे म्हणाली, “या देशात माझे घर आहे. या देशात मी माझी उपजीविका कमावली आणि कमावत आहे. या देशात मला नेहमी संधी मिळाली. यामुळे देशावर गर्व असण्यात मला काहीही लाज वाटत नाही. तुम्ही कुठेही राहत असलात तरी त्या जागेवर प्रेम करायला शिका. त्याचा आदर करायला शिका आणि देशासाठी योगदान द्या. कारण देशभक्ती म्हणजे केवळ माझे माझ्या देशावर प्रेम आहे, असे म्हणणे नाही. तर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सतत झटत राहणे होय.”
तक्रार नको तर योगदान द्या
आपल्याला काय म्हणायचे आहे, याचे उदाहरण देताना ईशा कोप्पीकर म्हणाली, “दोन प्रकारची मुले असतात. एक, जे आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी काय केले किंवा काय केले नाही, याचे मोजमाप करण्यात आयुष्य घालवतात. दुसरे ते असतात, जे मिळाले आहे, त्यात स्वतःचे आणि आपल्या आई-वडिलांचेही आयुष्य घडवतात. आपल्याकडे जे आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करतात. हा फरक फक्त परिस्थितीचा नाही तर विचारांचाही असतो.”
भारत आता बदलतोय मित्रांनो…
वरील दुसऱ्या मुलाचे उदाहरण देताना त्या पुढे म्हणाल्या, “देशाने आपल्याला काय दिले, हा प्रश्न सतत विचारण्याऐवजी आपण देशासाठी काय योगदान देऊ शकतो, याचा विचार करायला हवा. कारण भारत आता बदलत आहे मित्रांनो. आता वेळ आली आहे की, आपणही आपले विचार बदलायला हवेत. नवा भारत घडविण्यासाठी आपण आपले विचार बदलायला हेवत. या नव्या भारताचा आपणही भाग होऊया. त्यामुळे तुम्ही मला भक्त म्हणा किंवा अंधभक्त म्हणा. मला राष्ट्रवादी म्हणा, पण मी भारतीय आहे, मला माझा देश आवडतो. माझा भारतावर विश्वास आहे.”
