अभिषेक तेली

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ आणि परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ या दोन्ही चित्रपटांनी तिकीट खिडकीवर बक्कळ कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीला २०२३ या नवीन वर्षांची यशस्वी सुरुवात करून दिली. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘चि.व.चि.सौ.कां’ हे चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी रहस्य आणि हास्य या दोन गोष्टींची योग्य सांगड घालत केलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले. आता हा चित्रपट झी ५ या ओटीटी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक परिपूर्ण चित्रपट या कसोटीवर खऱ्या उतरलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाच्या संहितमेध्येच वेगळेपण आहे, असे परेश मोकाशी यांनी सांगितले.

‘माझे आधीचे सर्व चित्रपट हेसुद्धा निरनिराळय़ा कथांवर आधारित होते. कोणताही एक प्रकार मी कधीच हाताळला नाही. मग याच क्रमाला अनुसरून एक रहस्यकथा सुचली आणि मग ती फुलत गेली, त्यात वाळवी नावाचे पात्र येत गेले. पुढे जाऊन ही एक वेगळीच गमतीशीर रहस्यकथा बनली. प्रत्येक चित्रपटाप्रमाणे या वेळीसुद्धा एक नवीन आव्हान समोर होते, कारण कोणताही चित्रपट हा फक्त कथेमध्ये चांगला असून चालत नाही, तर तो एक परिपूर्ण चित्रपट म्हणून तयार होणे अत्यंत गरजेचे असते,’ असे त्यांनी सांगितले.

अभिनेता स्वप्निल जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव यांच्या अप्रतिम अभिनय कौशल्याने सजलेला हा चित्रपट क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासोबत त्यांना हसवतोसुद्धा. या अत्यंत अनुभवी व तरबेज अशा पाच कलाकारांप्रमाणे सर्व कलाकारांकडे उत्तम अभिनय कौशल्य असल्यामुळे दिग्दर्शकाला त्यांना अभिनय शिकवावा लागला नाही. यामुळे चित्रभाषेवर अधिक लक्ष देता आले. फक्त संहितेमध्ये वजन असून चालत नाही, एखादा चित्रपट चित्रभाषेद्वारे कसा सशक्त करता येईल, याकडे नेहमी माझा कल राहिला आहे, असे मत परेश मोकाशी यांनी व्यक्त केले. तर रहस्य आणि हास्य या दोन गोष्टींमध्ये समतोल राखावा लागला नाही, कारण जे संहितेमध्ये लिहिले होते, ते जसेच्या तसे आम्ही चित्रित करीत गेलो. अर्थातच कलाकार आल्यानंतर तालमी करताना एखादा शब्द इकडचा तिकडे होतो. काही नवीन गोष्टी व हालचाली सुचतात. यानुसार सर्व गोष्टी जमवल्या जातात, असेही मोकाशी सांगतात.

मध्यंतरी मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची रेलचेल होती आणि मराठी भाषेत एकाच पठडीतले चित्रपट असतात, असा सूर प्रेक्षकांमधून उमटू लागला होता; परंतु चित्रपटसृष्टीत ट्रेण्ड अशी काही गोष्ट नसते. दरवर्षी १०० ते १५० चित्रपट तयार होतात. त्यात ऐतिहासिक चित्रपटांचे प्रमाण किती आहे? मध्यंतरी हीच गोष्ट आपण चरित्रपटांबद्दलसुद्धा बोलत होतो. तेव्हा एकाच पठडीतल्या चित्रपटांची टक्केवारी ही फार नाही आहे. प्रेमकथा, ऐतिहासिक, चरित्रपट, कौटुंबिक अशा सर्व रसांचे चित्रपट हे त्या १००-१५० चित्रपटांच्या पंक्तीत असतात. हे चित्रपट एकाच धाटणीचे नसतात. एकाच धाटणीच्या चित्रपटांकडे आपण नकळतपणे जास्त लक्ष केंद्रित करतो, परंतु यातील काही चित्रपट हे सुपरहिट ठरतात हे तितकेच खरे आहे. यामुळे कोणताही प्रकार असला तरी चित्रपट चांगला होण्याकडे आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाढदिवस आणि ‘वाळवी’ चित्रपटाचे दणदणीत यश एक खास पार्टी आयोजित करून साजरे करण्यात आले. या वेळी लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांनी ‘वाळवी २’च्या कथेवर काम सुरू असून लवकरच वाळवीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा केली. यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. आता प्रेक्षकांना २४ फेब्रुवारीपासून ‘झी ५’ या ओटीटी माध्यमावर ‘वाळवी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वाळवीचा दुसरा भागही रहस्यमय
‘वाळवी’ चित्रपटाच्या पहिल्या भागाचे प्रसिद्धी कार्यक्रम करताना दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी सर्व कलाकारांना बजावून सांगितले होते की, कोणाशीही बोलताना चित्रपटातील कोणतेही रहस्य उलगडून सांगायचे नाही. आता ‘वाळवी’च्या दुसऱ्या भागाच्या लिखाणाला सुरुवात झाली असून ते अजून संपायचे असल्यामुळे त्याबाबत कोणतीही गोष्ट न फोडण्याचे चित्रपटाच्या टीमकडून ठरविण्यात आले आहे. जितके आपण गुलदस्त्यात ठेवू, जितके ते लोकांपर्यंत आधीच पोहोचणार नाही, तितके त्यांना प्रत्यक्ष चित्रपट पाहताना मिळणारा आनंद मोठा असेल. ‘वाळवी’च्या पहिल्या भागातूनच असा अनुभव प्रेक्षकांना आला आहे. प्रेक्षकांना काही गोष्टी या कळलेल्या नसल्यामुळे अगदी सुरुवातीच्या फ्रेमपासून प्रत्येक गोष्ट ही त्यांना नवीन वाटत होती. यामुळे पाचव्या, पंधराव्या व अध्र्या तासानंतर फुटणाऱ्या रहस्यांचा प्रेक्षकांनी क्रमाक्रमाने आनंद अनुभवला. यामुळे आमची अशीच रणनीती ‘वाळवी’च्या दुसऱ्या भागासाठी असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे ‘वाळवी’चा दुसरा भागसुद्धा भरगच्च रहस्यांनी आणि हास्यांच्या क्षणांनी भरलेला असणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

चित्रपट या माध्यमाची मजा चित्रपटगृहातील मोठय़ा पडद्यावरच..
एखादा चित्रपट हा संबंधित ओटीटी माध्यमावरसुद्धा प्रदर्शित होणार असल्याची घोषणा अनेकदा प्रदर्शनावेळीच होते; पण यामुळे तिकीट खिडकीवर काहीही परिणाम होत नाही आणि आर्थिक गणितेसुद्धा बिघडत नाहीत. प्रेक्षक हे चित्रपटगृहात गेल्यामुळेच एवढे सर्व चित्रपट हिट झाले आहेत. तिकीट काढताना प्रेक्षकांनासुद्धा माहीत असते की, आपल्याला हा चित्रपट काही दिवसांनी टीव्हीवर व मोबाइलवरसुद्धा पाहायला मिळणार आहे; परंतु शेवटी चित्रपट या माध्यमाची मुख्य शक्ती ही चित्रपटगृहात आहे, हे लोकांना माहिती आहे. चित्रपटगृहात जाऊन मोठय़ा पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजाच काही और आहे. यामुळे प्रदर्शनानंतर टीव्ही व मोबाइलवर चित्रपट पाहायला मिळणे, याकडे अतिरिक्त सुविधा म्हणून पाहिले जाते, असे मोकाशी यांनी स्पष्ट केले.

Story img Loader