IT Raid at actor Aryas House And Restaurant: तमिळ अभिनेता आर्य हा त्याच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखला जातो. ‘अरिंथम अरियामलम'(Arinthum Ariyamalum) या चित्रपटातून त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
अभिनेत्याच्या घर आणि रेस्टॉरंटवर आयकर विभागाचे छापे
आता मात्र अभिनेता त्याच्या चित्रपटांमुळे नाही तर आयकर विभागाने त्याच्या घरावर व हॉटेलवर छापे टाकल्याने चर्चेत आला आहे. ‘न्यूज १८’ नुसार आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चेन्नईतील सी शेल रेस्टॉरंटवर अचानक छापे टाकले. अण्णा नगर आणि वेलाचरी येथील विविध शाखांमध्ये १८ जूनला म्हणजेच आज सकाळी छापे टाकण्यात आले आहेत.
आर्य या रेस्टॉरंटशी दीर्घ काळापासून जोडला गेलेला आहे. रेस्टॉरंटच्या अण्णा नगर येथील ब्रँचमध्ये पाच आयकर अधिकारी तपासणीसाठी आल्याची माहिती समोर आली आहे. हे रेस्टॉरंट लोकप्रिय असल्याने तसेच आर्य या रेस्टॉरंटशी दीर्घ काळापासून जोडला गेलेला असल्याने आयकर विभागाच्या या छाप्याची चर्चा होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आयकर विभागाने आर्यच्या चेन्नईतील पूनमल्ली हाय रोड येथील घरावर व रेस्टॉरंटवर एकाचवेळी छापा टाकला.
आर्यने काही अरेबियन रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्याने ते विकले. समोर आलेल्या माहितीनुसार, आर्यने हे रेस्टॉरंट केरळमधील थलासेरी येथील कुन्ही मुसा या व्यक्तीला विकले होते. या व्यक्तीच्या मालमत्तेची आयकर विभागाकडून आधीच तपासणी सुरू आहे, त्यामुळे असे म्हटले जात आहे की रेस्टॉरंटच्या आर्थिक व मालकीबाबत चौकशी करण्यासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत.
दरम्यान, अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे तर तो ‘पट्टियाल’, ‘मद्रास पट्टिनम’, ‘बॉस इंगिरा भास्करन’, ‘अवन इवान’, ‘वेट्टाई’, ‘राजा रानी’ अशा चित्रपटांतून अभिनेत्याने काम केले आहे.
अभिनयाबरोबरच तो निर्मिती क्षेत्रातदेखील काम करताना दिसतो. त्याने काही दिवसांपूर्वीच त्याचा जवळचा मित्र संथानम अभिनीतबरोबर ‘डीडी नेक्स्ट लेवल’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही. सध्या अभिनेता पा. रणजीत यांच्या ‘वेट्टुवम’, ‘मिस्टर एक्स’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. आता अभिनेता आयकर विभागाने केलेल्या कारवाईवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.