अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. तिच्या धाडसाचे कौतुकच आहे. तुम्ही कोणतेही काम करत असलात तरीही कामाच्या ठिकाणी मानसिक किंवा शारिरीक छळ होणे ही बाब निषेधार्ह आहे. जे तुमच्यासोबत घडले आहे ते समोर येऊन बोलण्यासाठी खूप धाडस लागते, तनुश्रीने ते धाडस दाखवले आहे. तुम्ही जे बोलताय ते तुमच्या विरोधातही जाऊ शकते हे ठाऊक असून खरं बोलण्याचं धाडस दाखवणं महत्त्वाचं आहे. अनेकदा बदनामी होईल या भीतीने अन्याय झालेल्या अनेकजणी बोलतच नाहीत असे म्हणत अभिनेत्री अनुष्का शर्माने तनुश्री दत्ताला पाठिंबा दर्शवला आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

तनुश्री दत्ताने काय म्हटलं आहे?
अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमातील एका गाण्याचे चित्रीकरण सुरु होते त्यावेळी नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि माझ्यासोबत गैरवर्तन केले असे आरोप तनुश्री दत्ताने केले आहेत. #MeToo या मोहिमेबाबत तिला विचारले असता तिने हे उत्तर दिले आहे. एवढेच नाही तर मनसेच्या साथीने मला नाना पाटेकरांनी त्रास दिला असाही आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. मला अजूनही धमकावले जाते आहे. नाना पाटेकर हा चिंधी माणूस आहे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या साथीने त्यांनी मला त्रास दिला असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. एवढेच नाही तर २००८ मध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार फोडली असाही आरोपही तनुश्री दत्ताने केला आहे. तनुश्रीच्या या आरोपांनंतर काही कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. तर काही कलाकारांनी यावर न बोलणेच पसंत केले आहे.

दरम्यान तनुश्री दत्ताने जे आरोप केले आहेत त्यात काहीही तथ्य नाही असे नाना पाटेकरांनी म्हटले आहे. तर बिग बॉस या कार्यक्रमात जाण्यासाठी तनुश्री दत्ता स्टंट करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. एवढेच नाही तर राज ठाकरेंबाबत चुकीची वक्तव्ये केल्याने तिच्याविरोधात तक्रारही नोंदवण्यात आली आहे.