बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान यांना तिसरे अपत्य झाले असून, त्यांच्या तिसऱया मुलाने सरोगसी मदरपद्धतीने जन्म घेतला. महापालिकेकडील मुलाच्या जन्म दाखल्यावर पालक म्हणून शाहरूख खान आणि गौरी खानचे नावे असल्याचे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनिषा म्हैसकर यांनी सांगितले. या आपत्यासाठी केलेल्या गर्भलिंग निदान चाचणीवरून शाहरूख खानभोवती वादाचे मोहोळ उठले होते.
मनिषा म्हैसकर म्हणाल्या, ते अपत्य शाहरुखचेच आहे का, हे पडताळून पाहाण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली असून, याची खातरजमा झाल्यावर आम्ही शाहरूखला सरोगसीबाबतचा संपूर्ण तपशील सादर करण्यास सांगणार आहोत.  या मुलाच्या जन्माआधी गर्भलिंग चाचणी झाली होती का, याचीही माहिती आम्ही शोधत आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार या मुलाचा जन्म २७ मे रोजी झाला असून, गौरीची एक नातेवाईक नमिता चिब्बर ही या मुलाची सरोगेट मदर असल्याचा तर्क लावण्यात येत आहे.  मसरानी नर्सिंग होमच्या अहवालाचा दाखला देत महापालिकेच्या सुत्रांनी सांगितले की, ३४ आठवड्याच्या गर्भारपणानंतर जन्माला आलेल्या या बालकाचे वजन १.५ किलो आहे. शहरातील नर्सिंग होम आणि रुग्णालयांनी  प्रत्येक जन्माची नोंद ठोवणे बंधनकारक असून या नोंदीद्वारे माहापालिका पालकांना जन्म दाखला देते. प्रथम या मुलाला नानवटी रुग्णालयात नेण्यात आले होते, नंतर त्याला ब्रीच कॅन्डी रूग्णालयात हलविण्यात आले. आता त्याला शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर नेण्यात आले आहे.
याआधी, मिडियामधे येणा-या गर्भलिंग चाचणीच्या वृत्तावरून या प्रकरणाची खातरजमा करून घेण्यासाठी मागील महिन्यात महापालिकेने आपले एक पथक शाहरूख खानच्या घरी पाठवले होते, परंतू सदर पथकाला परत पाठविण्यात आले होते. देशात (पीसीपीएनडीटी) कायद्या अंतर्गत गर्भलिंग चाचणीस बंदी आहे. अॅड. वर्षा देशपांडे यांनी राज्य सरकार आणि महानगपालिकेकडे शाहरूख खानने गर्भलिंग परिक्षण केल्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. शाहरूख खानने याबाबत शांत राहणेच पसंत केले असून, अद्याप  याविषयीचा कोणताही खुलासा त्याने केलेला नाही.
लवकरच शाहरूख खान या मुलाच्या जन्माची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहरूख आणि गौरीला याआधी १५ वर्षांचा आर्यन आणि १३ वर्षांची सुहाना अशी दोन मुले आहेत.