भारताचे सुपरस्टार बॉक्सर डिंको सिंग यांचं निधन झालं. ४१ वर्षीय डिंको सिंग यांना गेल्या वर्षीच करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली, पण कर्करोगाविरुद्धची त्यांची झुंज मात्र अपयशी ठरली. बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. १९९८ मध्ये डिंको सिंग यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं.

२०१९ मध्ये जेव्हा बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने फिल्म प्रोडक्शनमध्ये पाऊल टाकण्याचा विचार केला होता, तेव्हा सुपरस्टार बॉक्सर डिंको सिंग यांच्यावर बायोपिक करणार असल्याचे संकते दिले होते. यासाठी अभिनेता शाहिद कपूरने डिंको सिंगच्या बायोपिकचे अधिकार देखील विकत घेतले होते. या बायोपिकच्या स्क्रिप्टींगवर देखील काम सुरू होतं. अभिनेता शाहिद कपूर स्वतः या बायोपिकमध्ये बॉक्सर डिंको सिंग यांच्या भूमिकेत दिसणार असं देखील बोललं जात होतं.

त्यावेळी शाहिद कपूर म्हणाला होता की, “मी डिंको सिंग यांच्या बायोपिकसाठी अधिकार विकत घेतले आहेत. त्यांच्यावर आधारित फिल्म बनवायची खूप इच्छा आहे आणि मी ती बनवून दाखवणारंच. बायोपिकसाठी अधिकार विकत घेतले तर आहेत पण पुढे काय करायचंय ते कळत नाही…पुढे कसं करायचं हे अजून ठरलेलं नाही. सगळं काही चर्चांमध्ये ठरलेलं आहे. या बायोपिकसाठीच्या पुढच्या कामांबद्दल अधिकृतरित्या सांगितलं जाईल. ”

दोन वर्षांपूर्वीच शाहिद कपूरने ही बायोपिक दिग्दर्शित करण्यासाठी राजा कृष्ण मेनन यांची निवड केली होती. दिग्दर्शक राजा कृष्ण मेनन यांनी यापूर्वी ‘एअरलिफ्ट’ आणि ‘शेफ’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केल्या आहेत.

त्यानंतर डिंको सिंग यांच्या बायोपिकसाठी कोणत्याच हालाचली झालेल्या दिसून आल्या नाहीत. पण सुपरस्टार बॉक्सर डिंको सिंग यांच्या निधनानंतर ही बायोपिक त्यांना ट्रिब्यूट देणारी ठरेल हे मात्र नक्की.