“हा पुरावा आहे हिमाचलचे लोकसुद्धा कंगना आणि भाजपाला पसंत करत नाही याचा”; बॉलिवूड अभिनेत्याची टीका

हिमाचल प्रदेशमध्ये चारही जागा काँग्रेसकडे गेल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्याने भाजपा आणि कंगनावर टीका केली आहे

Its proof that Himachal Pradesh people dont like both BJP and Kangna Ranaut krk tweet

लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत मतदारांनी संमिश्र कौल दिला होता. मात्र, पुढील वर्षी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या हिमाचल प्रदेशसह अन्य काही ठिकाणी भाजपाला पराभवाचा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील देगलूर-बिलोली विधानसभेची जागा काँग्रेसने कायम राखली, तर दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात भाजपला नमवत शिवसेनेने बाजी मारली आहे.

देशातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि २९ विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. हिमाचल प्रदेशातील निकाल भाजपसाठी धक्कादायक ठरला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा बालेकिल्ला असलेल्या मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे दिवंगत नेते वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी भाजपा उमेदवार ब्रिगेडिअर खुशाल चंद ठाकूर यांचा पराभव केला. हिमाचलमधील फतेहपूर आणि आरकी विधानसभा मतदारसंघ कायम राखतानाच काँग्रेसने जुब्बल-कोठाईची जागा भाजपाकडून काबीज केली आहे.

त्यानंतर आता कायमच बॉलीवूडच्या कलाकारांना निशाण्यावर धरणाऱ्या बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना रणौतवर टीका केली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये चारही जागा काँग्रेसकडे गेल्यानंतर केआरकेने भाजपा आणि कंगनावर टीका केली आहे. केआरकेने ट्विट करत या निकालाबाबत भाष्य केले आहे.

“काँग्रेसने मंडीची जागा (कंगना दीदीचे होम टाउन) मोठ्या फरकाने जिंकली आहे. हिमाचल प्रदेशातील लोक भाजपा आणि कंगना रणौत या दोघांनाही पसंत करत नाहीत याचा हा पुरावा आहे,” असे केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याआधी देखील केआरकेने बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतच्या खासगी आयुष्यावर कमेंट केली होती. केआरकेने कंगनाविषयी एक ट्वीट केले होते. मात्र, काही वेळानंतर त्याने हे ट्वीट डिलीट केले. केआकरकेन त्याच्या ट्वीटमध्ये दावा केला की कंगना इम्रान नावाच्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सोबतच केआरकेने लव्ह जिहादवरून कंगनावर निशाना साधला होता. यासोबत केआरकेने कंगनाचे दोन फोटोही शेअर केले होते, त्यात कंगना एका व्यक्तीसोबत होती. हे फोटो शेअर करत ‘ब्रेकिंग न्यूज- कंगना रणौत इम्रान नावाच्या एका इजिप्तच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ताई हे तर लव्ह जिहाद आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ अशा आशयाचे ट्वीट केआरकेने केले होते.

दरम्यान, काँग्रेसने थेट लढतीत भाजपाला पराभूत केले आहे. हिमालच प्रदेश, राजस्थानमधील विजयाचा काँग्रेसला पंजाबमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. हिमाचल प्रदेशमधील चार, राजस्थानातील दोन, महाराष्ट्रातील एक, कर्नाटकातील दोनपैकी एक अशा पोटनिवडणुकीतील आठ जागांवर काँग्रेसने थेट आव्हान देत भाजपाचा पराभव केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Its proof that himachal pradesh people dont like both bjp and kangna ranaut krk tweet abn

Next Story
गॉसिप