सलमान आणि माझे नाते फक्त मैत्रीचे- लूलिया वंतूर

लूलियाने तिच्या आणि सलमानच्या बहुचर्चित नात्याबाबत स्पष्टीकरण दिले

बॉलिवूडमधला ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचे नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. सध्या भाईजान सलमानचे नाव जोडले जात आहे ते लूलिया वंतूरसोबत. रोमानियाची लूलिया वंतूर आजकाल सलमानच्या प्रत्येक कार्यक्रमात, त्याच्या कुटुंबासोबत दिसते. त्यामुळे या दोघांमधल्या नात्याची सर्वत्र चर्चा होती. या वर्षाअखेरीपर्यंत सलमान आणि लूलिया विवाहबद्ध होणार असल्याचीही चर्चा आहे. पण, लूलियाने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका मासिकाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये लूलियाने तिच्या आणि सलमानच्या बहुचर्चित नात्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रोमानियाच्या लूलिया वंतूरने तिच्या आणि सलमानच्या नात्यावर प्रश्न विचारला गेला असता, ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत. हे नाते निव्वळ मैत्रीचे आहे, प्रेमाचे नाही’ असे लूलिया म्हणाली. प्रत्येक गोष्टीची स्वत:ची अशी एक वेळ असते. वेळेच्या आधी किंवा नंतर कोणतीही गोष्ट घडत नाही, असे विधान लूलियाने  केले. सलमान आणि लूलिया हे दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसतात त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांनीही विवाहबंधनात अडकल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण अर्थात, या बातमीला कोणीही दुजोरा दिला नसल्यामुळे याबाबतचे प्रश्नचिन्ह कायमच आहे. सलमानच्या ‘ट्युबलाइट’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणापासून ते ‘भाईजान’च्या रक्षाबंधन सेलिब्रेशनपर्यंत लूलिया जवळपास प्रत्येक कार्यक्रमात दिसली होती. दरम्यान सलमान सध्या ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत झु झु ही चीनी आभिनेत्रीसुद्धा झळकणार असून कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Iulia vantur on salman khan we are friends its not love