Rajinikanth’s Jailer 2 Dispute: रजनीकांत यांच्या आगामी ‘जेलर २’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा १५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडला आहे.
चित्रपटाच्या कमाईच्या वाटपावरून वितरक आणि चित्रपटगृह मालकांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. या वादाचा परिणाम तमिळनाडूमधील काही जिल्ह्यांतील चित्रपटाच्या प्रदर्शनावर होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
काय आहे नेमका वाद?
वन इंडियानुसार, ‘जेलर २’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईतील ७५ टक्के वाटा वितरकांकडून मागितला जात आहे. मात्र, चित्रपटगृह मालक ६५ टक्के वाटा देण्यास तयार असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही आकड्यांमधील फरकामुळे वितरक आणि चित्रपटगृह मालकांमध्ये वाद होत आहेत.
आता या वादामुळे नेमके कोणत्या थिएटर्सवर परिणाम होणार आहेत, याची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच १५ ऑक्टोबरला चित्रपटाच्या प्रदर्शनात काही अडथळा निर्माण होणार का हेही अजून स्पष्ट झालेलं नाही.
या वादामुळे अभिनेता विजयच्या ‘जन नायकन’ चित्रपटाच्या कमाईच्या वाटपाची चर्चा होत आहे. काही रिपोर्ट्सनुसार ‘जन नायकन’ चित्रपटासाठी ६५:३५ या प्रमाणात कमाईचं वाटप करण्याचे ठरले होते. आता ‘जेलर २’साठीही अशाच प्रकारच्या अटी लागू कराव्यात, अशी चित्रपटगृह मालकांची मागणी असल्याचं सांगितलं जात आहे.
कमाईच्या वाटपावरून वाद का होतो?
चित्रपटाच्या तिकीटविक्रीतून मिळणारी कमाई वितरक आणि चित्रपटगृह मालकांमध्ये कशा पद्धतीने विभागली जाणार हे महसूल वाटपाच्या करारातून ठरवलं जातं. चित्रपटगृह मालकांना त्यांच्या वाट्याला येणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, देखभाल आणि इतर खर्च भागवावे लागतात. याशिवाय कर आणि इतर खर्चांचाही त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.
मोठ्या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत प्रेक्षकांची मोठी गर्दी होते. मात्र, पुढील दिवसांत चित्रपटाच्या कमाईत चढ-उतार होऊ शकतात, त्यामुळे वितरकांबरोबर कमाईच्या वाटपाबाबत चर्चा करताना चित्रपटगृह मालकांना त्यांच्या खर्चाचाही विचार करावा लागतो.
‘जेलर २’ या सिनेमाबद्दल बोलायचे तर हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. आता जेलर २ हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
