राम चरण आणि जान्हवी कपूर यांच्या ‘पेड्डी’ (Peddi) चित्रपटाच्या प्रीमियरपासूनच, निर्मात्यांवर जान्हवी कपूरच्या भूमिकेवरून टीका होत आहे. या चित्रपटात जान्हवीने ‘अच्चियम्मा’ची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये तिला एखाद्या वस्तूप्रमाणे ऑब्जेक्टिफाय करण्यात आलंय. इतकंच नाही तर मुख्य अभिनेत्याकडून तिच्यावर अत्याचार होतानाही दाखवलं गेलं आहे. चित्रपटातील आपली ही भूमिका वादग्रस्त आहे, या प्रेक्षकांच्या मताशी स्वतः जान्हवी कपूरही सहमत असल्याचं आता दिसत आहे.

‘पेड्डी’वर टीका करणाऱ्या पोस्टला जान्हवी कपूरने केले ‘लाईक’

‘रिकमेंडेशन कम्युनिटी’ या इन्स्टाग्राम पेजने ‘पेड्डी’ चित्रपटासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टचं शीर्षक “पेड्डी: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एका मुख्य अभिनेत्रीचा झालेला आतापर्यंतचा सर्वात महागडा अपमान” असं होतं. या पोस्टमध्ये ३५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. चित्रपटात एका बाजूला मानवी हक्क आणि अस्मिता नाकारणं हा एक सामाजिक गुन्हा असल्याचं दाखवलंय, तर दुसऱ्या बाजूला जान्हवीच्या ‘अच्चियम्मा’ या पात्राला मात्र त्याच गोष्टी नाकारल्या गेल्या आहेत. तसेच, राम चरणच्या पात्राला सामाजिक-राजकीय लढ्यासाठी हिरो बनवलं गेलंय. दुसरीकडे जान्हवीच्या पात्राला मात्र केवळ ग्लॅमरस अँगल आणि कंबरेच्या क्लोज-अप शॉट्स पुरतं मर्यादित ठेवल्याबद्दलही पोस्टमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे.

या पोस्टमधील एका फोटोवर पुढे लिहिलंय की, “अभिनेत्रीने अशी भूमिका स्वीकारल्याबद्दल तिच्यावर टीका करणं सोपं आहे, पण यामागची खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. असं म्हटलं जातंय की जान्हवी कपूरने पोस्ट-प्रोडक्शनवेळी, चित्रपट एडिट होत असताना वेळी अशा शॉट्सवर स्पष्टपणे आक्षेप घेतला होता. चित्रपटसृष्टीत महिलांचे अति-लैंगिकीकरण करण्याविरोधात तिने घेतलेल्या जाहीर भूमिकेसारखीच भूमिका तिने घेतली होती. तसेच ती निर्मात्यांशीही याबद्दल बोलली होती, पण तरीही शेवटच्या एडिटिंगमध्ये ते सीन्स तसेच ठेवण्यात आले. त्यामुळे, इथे अभिनेत्रीने स्वतःसाठी आवाज उठवला नाही, असं घडलेलं नाही. तर, चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिच्या संमतीपेक्षा बॉक्स ऑफिसच्या कमाईला जास्त महत्त्व दिलं आणि तिच्या म्हणण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय.”

jahnvi kapoor likes peddi trolling post
जान्हवी कपूरने लाइक केलेली पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

जान्हवीने या पोस्टवर कोणतीही कमेंट केली नाही, पण तिने ही पोस्ट लाईक केल्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. या कृतीवरून ती पोस्टमधील मताशी पूर्णपणे सहमत असल्याचं स्पष्ट होतं. यावर एका युझरने रडणारे इमोजी टाकत कमेंट केली, “जान्हवी कपूरने ही पोस्ट लाईक केली आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “बापरे! ही पोस्ट चक्क जान्हवी कपूरने लाईक केली आहे. हा टॉलिवूडचा अपमान आहे.”

‘पेड्डी’ चित्रपटात एक अत्यंत आक्षेपार्ह लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. पण त्याला दिग्दर्शकाने रोमान्स आणि प्रेमाचं नाव दिलंय. चित्रपटातील ‘पेड्डी’ हे पात्र असं म्हणताना दिसतं की, त्याला अच्चियम्माच्या मर्जीशिवाय तिला स्पर्श करायचा आहे, कारण ती कधीच त्याच्यावर प्रेम करणार नाही आणि तिचे वडीलही त्यांचे लग्न लावून देणार नाहीत. पुढे एका सीनमध्ये वीज गेल्यानंतर तो संमतीशिवाय तिला किस करतो. त्यानंतर जेव्हा अच्चियम्मा रडू लागते, तेव्हा एक एक पुरुष पात्र तिच्या वडिलांच्या राजकीय करिअरचा विचार करून तिला ही गोष्ट विसरून जाण्यास सांगतो.

एकूणच पेड्डी हा चित्रपट त्यातील आक्षेपार्ह दृश्ये, त्यात जान्हवीचे पात्र ज्या पद्धतीने दाखवलेय त्यामुळे वादात अडकला आहे. इतकंच नाही तर जान्हवी कपूरच्या पात्राच्या कपड्यांवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.