बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर प्रकाशझोतात आली आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या जान्हवीबद्दल बऱ्याच गोष्टी, तिची मतं जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘वोग इंडिया’साठी तिने नुकतंच फोटोशूट केलं असून याच मासिकाला तिने पहिलीवहिली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत जान्हवीने स्वत:विषयी, आई श्रीदेवी यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या. या मुलाखतीत करण जोहरसुद्धा तिच्यासोबत होता.

जान्हवीने चित्रपटसृष्टीत काम करू नये अशी श्रीदेवी यांची इच्छा होती. त्याबद्दल जान्हवी म्हणाली की, ‘मी अभिनेत्री व्हावी अशी तिची मुळीच इच्छा नव्हती. खुशीने या क्षेत्रात काम करावं असं तिला वाटत होतं. मी फार साधी असल्याने इथल्या तीव्र स्पर्धेच्या वातावरणात काम करू शकणार नाही असं तिचं मत होतं. ती जे काम करायची ते तिला फार आवडायचं. मला अभिनय प्रशिक्षणासाठी कॉलेजमध्ये सोडताना ती म्हणाली होती की, फूल को किचड मे छोड कर चली जा रहीं हू मै (चिखलात मी एका फूलाला सोडून जात आहे).’

#Sanjutrailer: तेव्हा आणि आताही संजू म्हणतोय, ‘आय अॅम नॉट अ टेररिस्ट’

शालेय शिक्षण आणि अभिनयाच्या आवडीविषयी तिने सांगितलं की, ‘शाळेत माझ्या हजेरीची टक्केवारी खूप कमी होती. ती अवघे ३० टक्के होती. माझ्या पालकांसोबत मी सतत फिरत असायचे. चित्रपटांच्या सेट्सवर माझा बराच अभ्यास व्हायचा. फक्त पास होण्यापुरते गुण मला मिळत होते. शालेय शिक्षणानंतर मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या. सुरुवात अभिनयापासून केली आणि मला ते फार आवडू लागलं. झोपताना आई मला तिच्या सेटवरील बऱ्याच गोष्टी सांगायची.

वाचा : ‘त्या’ पोस्टमुळे अभिषेकला ऐश्वर्याकडून मिळाली चांगलीच शिक्षा 

या मुलाखतीत जान्हवीने श्रीदेवी यांच्यासोबत व्यतित केलेल्या अखेरच्या क्षणांचाही उलगडा केला. ‘मी कितीही मोठी झाले तरी तिच्यासाठी मी अगदी लहान मुलगीच होती. सकाळी उठल्या उठल्या मी आधी तिच्यासाठीच विचारायचे. बऱ्याचदा ती मला रात्री झोपवत असे आणि कधी कधी तर तिने मला जेवणसुद्धा भरवलं होतं. ज्या दिवशी ती दुबईला लग्नाला जाणार होती त्याच्या आदल्या दिवशी मला शूटिंगला जायचं होतं. मला झोप लागत नव्हती. मला झोपवण्यासाठी मी तिला हाक मारत होती पण ती पॅकिंगमध्ये व्यग्र होती. तिचं काम संपल्यावर माझ्याजवळ आली तेव्हा मी अर्धवट झोपेत होती. माझ्या डोक्यावर ती हळूवारपणे हात फिरवत असल्याचं मला जाणवत होतं,’ असं ती म्हणाली.

निधनापूर्वी श्रीदेवी यांनी ‘धडक’च्या शूटिंगच्या २५ मिनिटांचा फूटेज पाहिल्याचं करणने सांगितलं. त्यावेळी जान्हवीला त्यांनी मेकअपपासून ते हावभावांपर्यंत बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या होत्या.