तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा जेसन संजयने ‘सिग्मा’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. हा चित्रपट आज, २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाचा पहिला शो पाहण्यासाठी अनेक चाहते थिएटरमध्ये दाखल झाले.

जेसनची आई आणि विजय यांची पत्नी संगीता, तसेच त्याची बहीण दिव्या विजय या ‘सिग्मा’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाताना स्पॉट झाल्या. दोघीही कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर चेन्नईतील कमला सिनेमाजच्या बाहेर चित्रपट पाहण्यासाठी जाताना दिसल्या. मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा जेसन संजय दिग्दर्शित ‘सिग्मा’ या चित्रपटाची निर्मिती लायका प्रॉडक्शन्सने केली आहे. या चित्रपटात सुंदीप किशन मुख्य भूमिकेत असून फारिया अब्दुल्ला ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. आज सकाळी ९.३० वाजता हा चित्रपट संपूर्ण तमिळनाडूमधील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

जेसन संजय हा तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा मुलगा असल्याने त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘सिग्मा’कडून अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत. दरम्यान, विजय लवकरच थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट पाहणार असल्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मात्र, ते आजच चित्रपट पाहणार आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार मुख्यमंत्री विजय आजपासून महिलांसाठीच्या मोफत बस प्रवास योजनेची सुरुवात करत आहेत. त्यानंतर ते मधुरांतकम येथील निवडणूक प्रचारासाठी रवाना होणार आहेत.

‘सिग्मा’ची कथा काय?

जेसन संजय दिग्दर्शित ‘सिग्मा’ची कथा एका बेधडक खजिना शोधणाऱ्या व्यक्तीभोवती फिरते. मोठ्या खजिन्याच्या शोधात तो प्रत्येक नियम मोडतो. जीवघेणे सापळे आणि विश्वासघाताचा सामना करताना तो आपल्या चातुर्य आणि धाडसाच्या जोरावर पुढे जातो. रोमांच आणि थराराने भरलेला हा साहसी चित्रपट आहे.

दरम्यान, ‘सिगमा’ हा चित्रपट आधीच रिलीज होणार होता मात्र जोसेफ विजय यांचा शेवट चित्रपट मानला जाणारा ‘जन नायकन’ बऱ्याच विलंबनानंतर रिलीज झाल्याने बॉक्स ऑफिसवरील स्पर्धा टाळण्यासाठी सिगमा’च्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट बदलली. आता अखेर हा चित्रपट रिलीज झाला असून विजय त्यांच्या मुलाचा चित्रपट पाहण्यासाठी जातील का आणि त्यांची काय प्रतिक्रिया येईल याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष आहे.