मुंबई :  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतने सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर होऊन निर्दोष असल्याचे सांगितले. त्यामुळे कंगनावर या प्रकरणी आता खटला चालवण्यात येईल.

अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युनंतर कंगनाने बालिवूडमधील घराणेशाहीवर टीका करताना अख्तर यांच्याबाबतही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर अख्तर यांनी तिच्याविरोधात मानहानीची फौजदारी तक्रार दाखल केली होती.

महानगरदंडाधिकारी आर. शेख यांनी कंगनाला समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी कंगना सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास न्यायालयासमोर हजर झाली. त्यानंतर आपल्याला या प्रकरणी माध्यमप्रणित निवाडा (मीडिया ट्रायल) नको असल्याचे कंगनाने सांगितले. तसेच इन-कॅमेरा सुनावणी घेण्याची विनंती केली. तिची विनंती न्यायालयाने मान्य केली. तसेच कर्मचारी वर्ग आणि प्रकरणाशी संबंधित वकीलवगळता अन्य सगळय़ांना न्यायालयाने न्यायदालनाबाहेर जाण्यास सांगितले. न्यायालयाने सुनावणीच्या वेळी कंगनाला तिच्यावरील आरोप सांगितले असता तिने ते अमान्य असल्याचे सांगितले. याच न्यायालयात कंगनाने अख्तर यांच्याविरोधात तक्रारी नोंदवली असून त्यात तिचा जबाब नोंदवण्यात आला.