Javed Akhtar on Hijab Row: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्राचे वाटप करत असताना एका महिला डॉक्टराचा हिजाब खेचला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. राजकारणा व्यतिरिक्त कलाविश्वातूनही यावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. ‘दंगल’फेम अभिनेत्री झायरा वासिमने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका करताना त्यांनी माफी मागायला हवी, अशी मागणी केली होती. आता प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही याप्रकरणावर भाष्य केले आहे.
जावेद अख्तर यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यावर आपली भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हिजाबसारख्या संवेदनशील मुद्द्यावर राजकारण करणे चुकीचे आहे. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो. खासकरून पुढाऱ्यांनी याविषयी विचारपूर्वक मत व्यक्त करायला हवे, कारण त्यांच्या बोलण्याचा थेट परिणाम समाजावर होत असतो.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर म्हणाले, “सर्वांनाच माहीत आहे की, “मी बुरखा प्रथेच्या किती विरोधात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, नितीश कुमार यांनी एका मुस्लीम महिलेचा हिजाब खेचल्याच्या प्रकरणाचा मी स्वीकार करेन. मी सदर प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो. नितीश कुमार यांनी त्या महिलेची बिनशर्त माफी मागावी.”
प्रकरण काय आहे?
आयुष डॉक्टरांना प्रमाणपत्रांचे वाटप करत असताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुस्लीम डॉक्टर महिलेने परिधान केलेला हिजाब खेचण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने एक्सवर हा व्हिडीओ शेअर करत नितीश कुमार यांना लक्ष्य केले होते.
मुख्यमंत्री सचिवालयाने १००० आयुष डॉक्टरांना प्रमाणपत्रे वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात प्रतिकात्मक स्वरुपात काही निवडक डॉक्टर्सना खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते प्रमाणपत्रे दिली जाणार होती. त्यानुसार एक महिला डॉक्टर प्रमाणपत्र घेण्यास पुढे आली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार महिलेला उद्देशून म्हणाले, हे काय आहे? आणि त्यांनी हिजाब दूर करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर नितीश कुमार यांच्या मागेच उभे असलेले उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. तसेच बाजूला उभे असलेल्या अधिकाऱ्यांनीही हस्तक्षेप केला.
