जातीभेदाचं विष आपल्या समाजात खोलवर भिनलेलं आहे, हे जितकं कटू सत्य आहे तितकीच ही विखारी भावना पुढच्या पिढीतही उतरवण्याचं काम शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून सहजपणे केलं जात आहे. वर्णद्वेषी विचारांची ही बीजे तरुण पिढीच्या मनात रुजण्याआधी नष्ट करायची असतील तर आरक्षणासह ज्या ज्या मुद्द्यांचा आधार घेत समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, त्यावर तरुणांशी संवाद साधायला हवा. संविधानाचा अभ्यास आणि सामाजिक वास्तव दोन्हींची सांगड घालून सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने तरुण पिढीला वळवणं किती गरजेचं आहे हे मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी ‘जयंती २’ या सिक्वेलपटाच्या माध्यमातून केला आहे.
‘जाता जात नाही ती जात’ हे शिक्षणाने, आर्थिक परिस्थितीने पुढारलेल्या आजच्या समाजाचंही वास्तव आहे. ‘जयंती २’ या पहिल्याच चित्रपटात लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी राजकीय नेत्यांकडून जातीच्या नावावर होणारं समाजाचं ध्रुवीकरण, राजकीय सोयीपुरता होणारा महापुरुषांच्या नावाचा वापर याचा परामर्श घेतला होता. ‘जयंती २’ हा सिक्वेलपट असला तरी त्याचा आधीच्या कथानकाशी काही संबंध नाही. मात्र, कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी जातीद्वेष वेगवेगळ्या पद्धतीने समाजात कशा पद्धतीने मूळ धरून आहे, हे सूत्र कायम ठेवत वास्तवाची जाणीव करून देणारी कथा नरवाडे यांनी लिहिली आहे. याहीवेळी लेखन-दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः तरुण पिढीच्या मनातही अर्धवट माहितीच्या आधारे जातीपातीचं विष कसं कालवलं जातं आहे, याचं चित्रण नरवाडे यांनी केलं आहे. मात्र, त्याचबरोबरीने शिक्षणाचा अधिकार, कायद्याची तरतूद काय आहे, आरक्षण नेमकं कोणासाठी आणि का? असे महत्त्वाचे सामाजिक मुद्दे समजून घेण्याबाबत तरुण पिढीची उदासीन वृत्ती, न्यायासाठी न लढता अपुऱ्या किंवा व्हॉट्सॲप विद्यापीठातील प्रचलित माहितीच्या आधारे केले जाणारे मतप्रदर्शन याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
पुण्यातील महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेल्या पायल मरकमला पहिल्याच दिवशी जातीभेदाच्या वास्तवाला सामोरं जावं लागतं. वर वर पाहता घटना साधी वाटते. लवकर येऊन पहिल्या बाकावर बसलेल्या पायलला काही मुली उठवून मागच्या बाकावर बसायला भाग पाडतात. आदिवासी पायलचं आरक्षणाचा आधार घेत प्रवेश मिळवणं एका मोठ्या विद्यार्थी वर्गाला खटकतं आहे. आपल्यापेक्षा कमी गुण असून केवळ आरक्षणाच्या आधारेच तिला प्रवेश मिळाला आहे यावरून तिला हिणवण्याचा प्रत्न होतो. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात नडणाऱ्या पायलला वर्ग शिक्षकांकडूनही न्याय मिळत नाही. उलट तिच्यावरच निलंबनाची कारवाई केली जाते. पायल प्रकरणात तिची काहीच चूक नाही हे लक्षात आलेली तनुजा, महाविद्यालयात उपाहारगृह चालवणारा संत्या आणि काही विद्यार्थी मंडळी याप्रकरणी न्याय मागण्यासाठी एकत्र येतात. तर विद्यार्थ्यांना योग्यतेच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश मिळायला हवा, आरक्षणाच्या नव्हे, असा मुद्दा उपस्थित करून आपल्या कार्यकर्त्यांच्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी राजकारण करणारी मनोहर यांच्यासारखी मंडळी कशा प्रकारे तरुण कार्यकर्त्यांची माथी भडकवतात हेही यात पाहायला मिळतं. अखेर या लढ्यात नेमकं काय होतं? याची नाट्यमय मांडणी करण्यापेक्षा वैचारिक अंगाने हा विषय खुलवत नेण्यावर दिग्दर्शकाने भर दिला आहे.
एकाअर्थी अति नाट्यमय मांडणी न करता संवाद आणि चर्चा अशा वेगळ्या मांडणीतून लेखक – दिग्दर्शकाने चित्रपट खुलवला आहे. पण, ते करताना नाही म्हटलं तरी अनेक ठिकाणी चित्रपट काहीतरी दाखवण्यापेक्षा सतत बोलत राहतो. त्यामुळे चित्रपटाला काहीसा उपदेशात्मक सूर लागला आहे. पण, यातल्या मुद्द्यांची मांडणी ही अभ्यासात्मक, खोलवर विचार करून संयमाने केलेली आहे हेही तितकंच खरं. पायलच्या भूमिकेतील अभिनेत्री पायल जाधव हिने तिचा सच्चेपणा, अन्यायाविरोधात येणारा संताप, तिची संशोधक वृत्ती अशा सगळ्या छटा उत्तम साकारल्या आहेत. प्रियदर्शिनी इंदलकरची तनुजा ही तिच्या आजवरच्या भूमिकांमध्ये प्रभावी आहे. ऋतुराज वानखेडे याने संत्याच्या भूमिकेसाठी वापरलेली बोलीभाषा, त्याचा हेल शेवटपर्यंत अचूक टिकवला आहे. देविका दफ्तरदार यांनी प्राध्यापिकेच्या छोटेखानी भूमिकेतही लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटातल्या निवडक व्यक्तिरेखा उत्तम जमून आल्या आहेत. मात्र, पायलची व्यक्तिरेखा मध्यवर्ती असूनही एका टप्प्यावर ती पूर्णपणे बाजूला पडते. मांडणीतले हे काही कच्चे दुवे सोडले तर शैलेश नरवाडे यांनी ‘जयंती २’ च्या माध्यमातून महत्त्वाचा विषय हाताळला आहे यात शंका नाही.
दिग्दर्शक – शैलेश नरवाडे
कलाकार – पायल जाधव, प्रियदर्शिनी इंदलकर, ऋतुराज वानखेडे, देविका दफ्तरदार, विजय निकम आणि रोहिणी हट्टंगडी
