काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जयंती’ या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने सामाजिक क्षेत्रात मोठी चर्चा घडवली होती. आता त्याचा सीक्वेल ‘जयंती २’ या नावाने येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर नुकताच समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाचा नायक संत्या म्हणजेच अभिनेता ऋतुराज वानखेडे याही चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. ‘जयंती २’ हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित असेलल्या विषयावर भाष्य करतो. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या वाट्याला येणारा भेदभाव हा विषय चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

‘जयंती २’ या चित्रपटाची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. या चित्रपटात ऋतुराजबरोबर पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे, मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलन फैसल महाडिक यांचे आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले असून पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे.

‘जयंती’ हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा तरुणांवर पडणारा प्रभाव आणि होणारा सकारात्मक बदल याची गोष्ट चित्रपटात मांडण्यात आली होती. वेगळा विषय आणि नव्या पद्धतीच्या मांडणीमुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. आता आणखी एक पाऊल पुढे जात सध्या शिक्षण क्षेत्रात अनेक घडामोडी घडत असताना ‘जयंती २’ हा चित्रपट निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे.