बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो. तो कोणतीही भूमिका साकारू शकतो हे प्रत्येकवेळी रणवीर दाखवून देतो. नुकताच रणवीरच्या जयेशभाई जोरदार (Jayeshbhai Jordaar) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा होत आहे. त्यात आता जयेशभाई जोरदारचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा आनंद शिगेला पोहोचला आहे असं म्हणायला हरकत नाही.

जयेशभाई ही भूमिका रणवीरने साकारली आहे. जयेश ही भूमिका समाजावर असलेल्या पितृसत्ताक दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. त्याच्या कुटुंबात एक मुलगा असलाच पाहिजे असा अट्टाहास असतो. पण त्याला मुलगा होत नसल्याने त्याच्या घरचे दुसरं लग्न करण्याचा आग्रह धरतात. या सगळ्यात जयेशभाई समाजाच्या विरोधात जातो. तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत पळून जातो. आता तो यात यशस्वी होईल की सामाजिक नियमांना बळी पडेल? हा प्रश्न ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना पडला आहे. जयेशभाई जोरदार या चित्रपटाचा ट्रेलर हा २ मिनिटे ५७ सेकंदाचा आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्न बंधनात?

आणखी वाचा : ऐश्वर्या रायपासून काजोलपर्यंत, आलिया भट्टच्या आधी ‘या’ ७ अभिनेत्रींनी दिली लेहेंग्या ऐवजी साडीला पसंती

चित्रपटात रणवीरच्या पत्नीची भूमिका ही अभिनेत्री शालिनी पांडे (Shalini Pandey) साकारत आहे. तर जयेशभाईच्या वडिलांची भूमिका ही बोमन इराणी (Boman Irani) आणि आईची भूमिका ही रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिव्यांग ठक्करने केले आहे. हा चित्रपट १३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या व्यतिरिक्त रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे. त्यानंतर रणवीर आलिया भट्टसोबत करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यात दिसणार आहे.