Jeeva Joseph-Aparna Thomas Divorce: मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं जीवा जोसेफ आणि अपर्णा थॉमस यांनी घटस्फोटाची घोषणा केली आहे. ११ वर्षांचा संसारानंतर ते विभक्त झाले आहेत. ११ वर्षांपूर्वी ज्या तारखेला त्यांनी लग्न केलं होतं, त्याच तारखेला त्यांनी घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. दोघांनीही आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्या आणि हे नातं संपल्याची माहिती दिली. विभक्त झाल्यानंतर या जोडप्याने लोकांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली आहे.

“ही गोष्ट तुम्हा सर्वांशी शेअर करणं माझ्यासाठी सोपं नाहीये, पण मला वाटलं की मी हे स्वतः तुम्हाला सांगितलं पाहिजे. कारण माझ्या या प्रवासात—माझ्या करिअरमध्ये, माझ्या आनंदात आणि कठीण काळात तुम्ही नेहमीच माझ्यासोबत राहिला आहात.
तुमच्यापैकी अनेकांनी आम्हाला एक जोडपं म्हणून खूप प्रेम दिलं, पण यापुढे ‘आम्ही’ नसू. आता जीवा आणि अपर्णा वेगळे असतील.
लग्नाच्या ११ वर्षांनंतर आम्ही दोघेही वेगवेगळ्या मार्गाने जातोय. कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि आता आमचं नातं पुढे जाऊ शकत नाही, हे सत्य आम्ही स्वीकारलं आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून यामागचे कारण पूर्णपणे वैयक्तिक आहे.
आम्ही जसा हा निर्णय अत्यंत समंजसपणाने घेतला आहे, तसाच तुम्हीही तो सकारात्मकतेने घ्याल, अशी आशा आहे. हा आमचा अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे, त्यामुळे या काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि आम्हाला समजून घ्यावं, ही विनंती.
असं म्हणतात की ‘प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही कारण असते,’ माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे,” अशी पोस्ट जीवा जोसेफने केली आहे.

“नमस्कार, मला माहीत आहे की तुमच्यापैकी अनेक जण वाट पाहत होते की मी या विषयावर कधी बोलेन, त्यामुळेच ही पोस्ट करतेय.
होय, हे लग्न आता संपलंय. आमचं नातं टिकू शकलं नाही आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर मला ते पुढे टिकवायचंही नव्हतं. माझ्या मते, हा निर्णय आम्हा दोघांसाठीही सोपा नव्हता, पण स्वतःसाठी मला हा निर्णय घेणं अत्यंत गरजेचं होतं.
आज मी खऱ्या अर्थाने शांततेत आहे. मी आनंदी आहे, मला सुरक्षित वाटतंय आणि खूप काळानंतर मन खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय.
नेमकं काय घडलं यात मला पडायचं नाही किंवा प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरणही द्यायचं नाही, कारण काही गोष्टी अत्यंत खासगी असतात.
मला आता फक्त आयुष्यात पुढे जायचंय आणि शांततेने जगायचं आहे.
कृपया माझ्या आणि आमच्या प्रायव्हसीचा आदर करा अन् आम्हाला स्पेस द्या, एवढीच माझी विनंती आहे.
आशा आहे की तुम्ही मला समजून घ्याल,” अशी पोस्ट अपर्णाने केली आहे.

दरम्यान, जीवा जोसेफ व अपर्णा यांनी २४ ऑगस्ट २०१५ रोजी लग्न केलं होतं. आणि ११ वर्षांनंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली.