Jewel Mary slams rumours: दाक्षिणात्य अभिनेत्री ज्वेल मेरी तिच्या सूत्रसंचालनासाठीदेखील लोकप्रिय आहे. तिने टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ती वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. ज्वेल मेरीच्या प्रकृतीबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहेत.अभिनेत्रीला कॅन्सर झाला असून तिचा आवाज पूर्णपणे गेला आहे, तसेच ती गंभीर अवस्थेत असल्याचेदेखील म्हटले जात होते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यावर वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली आहे हे जाणून घेऊ…

“काही लोकांनी तर मला मृत…”

अभिनेत्रीने सोशल मीडिया ट्रेडमिलवर व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. ती म्हणाली, “गेल्या दोन दिवसांत माझ्याबद्दल काही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याचे सत्य सांगण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करत आहे. काही लोकांनी तर मला मृत घोषित केले आहे. माझा आवाज गेला आहे, मी मृत्यूशय्येवर आहे आणि मला चालताही येत नाही, असे दावे केले जात आहेत. काहींनी माझ्या अंत्यविधीचे कार्डही छापले आहे. पण, मी अजूनही पूर्णपणे जिवंत आहे, मी मेली नाहीये, माझं निधन झालं नाही.”

पुढे ती म्हणाली, “२०२३ मध्ये ‘Kerala Can’ या कार्यक्रमामध्ये मी मला झालेल्या कॅन्सरबद्दल सांगितले होते. त्यातील संदर्भ घेऊन माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. जे माझ्याबद्दल अशा प्रकारची माहिती पसरवत आहेत, त्यांना मला हे सांगायचे आहे की मी जिवंत आहे, आनंदी आहे आणि माझी प्रकृती चांगली आहे. त्यामुळे कोणीही अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका.”

तसेच, अशा अफवा ऐकल्यानंतर अनेकांनी तिच्या काळजीपोटी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, प्रकृतीची चौकशी केली. त्या सगळ्या चाहत्यांना उद्देशून अभिनेत्री म्हणाली की मी ठीक आहे, मी आनंदात आहे. तुम्हीही आनंदात राहा.

कर्करोगाबद्दल काय म्हणालेली अभिनेत्री?

ज्ञान वर्माला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणालेली, “मी नियमित तपासणीसाठी गेले होते त्यावेळी मला प्रकृतीची इतर कोणतीही समस्या नव्हती. पण, खोकला आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कफ बाहेर येत असे. मला वारंवार घसा साफ करावा लागत असे. सूत्रसंचालक म्हणून मला सतत आवाजाचा वापर करावा लागतो, त्यामुळे ही समस्या होत असावी असे मला वाटत होते. माझी ही समस्या ऐकल्यानंतर डॉक्टरांनी मला स्कॅन करायला सांगितले. जेव्हा रिपोर्ट आले, त्यावेळी मला खूप भीती वाटत होती. भीतीने माझे पाय थंड पडले होते. डॉक्टरांनी मला बायोप्सी करण्यास सांगितले. सुरुवातीला मी नकार दिला. पण, डॉक्टरांनी समजावल्यानंतर मी बायोप्सी केली. त्यांनी सांगितले की कॅन्सर असू शकतो. जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा कॅन्सर असल्याचे समजले. त्यानंतर आणखी एकदा बायोप्सी करण्यात आली.

अभिनेत्रीने असेही सांगितले की, माझ्यावर सात तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर त्यांचा आवाज पूर्णपणे गेला. डॉक्टरांनी सांगितले होते की बरे होण्यासाठी जवळजवळ सहा महिने लागतील. माझा डावा हातही कमकुवत झाला होता. मला कोणतीही कामे करता येत नव्हती. त्यानंतर फिजिओथेरपी आणि इतर उपचार सुरू झाले. सहा महिन्यांनंतर मी तपासणीसाठी गेले, त्यावेळी डॉक्टरांनी रिपोर्ट बघून आता कॅन्सर नसल्याचे सांगितले. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता. आता मला दर सहा महिन्यांनी तपासणी करावी लागते, असे अभिनेत्रीने सांगितले होते.