‘झिम्मा’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित

शिर्षक गीतानंतर चित्रपटातील हे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती. मात्र महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटातील शिर्षक गीत काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे.

‘झिम्मा’ चित्रपटातील ”माझे गाव” हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. ”कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव” असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणे ऐकताना आपले मन अतिशय शांत होते. विचारांचा वेग मंदावतो आणि ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे.

‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे.

सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Jhima movie news song majhe gaon released avb

ताज्या बातम्या