एखादं नाटक, सिनेमा किंवा एखादी कलाकृती आपल्याला का आवडते ? – आपण आपली संवेदना, मत, भावना तशी मनात साठवून ठेवलेली असते. ती भावना, मत आणि आपल्याच मनातील गोष्ट समोर दिसली की ती कलाकृती आवडते. कधी खोल दडलेली भावना एखादी कलाकृती झपकन पुढे आणून ठेवते, अचंबित होतो आपण त्या वेगाने तेव्हा आपण रममाण होऊन जातो कथेत किंवा कथाप्रारूपात. आपलाच विचार, आपलेच मत, आपल्याच जाणिवेवर टाकलेला पडदा एखादे नाटक बाजूला करते तेव्हा ते नाटक जिवंत होते. असा जिवंत अनुभव देण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांसून जिगीषा नाट्य महोत्सवात केला जात आहे. या वर्षी तर रत्ना पाठक – शाह आणि अतुल पेठे, चंद्रकांत कुलकर्णी, अजित दळवी, प्रशांत दळवी या दिग्गजांनी जिगीषा नाट्यसहवासातून मराठवाड्यातील सांस्कृतिक जाणिवांमध्ये मोलाची भर टाकली.
आपली बोली, आपला भोवताल आणि यासह नाटकाचा स्वतंत्र विचार करणाऱ्या मराठवाड्यातील एका पिढीने ‘जिगीषा’ नाट्यसंस्था निर्माण केली. पुढे तिचा राज्यभर दबदबा निर्माण झाला. नाटकाच्या ‘प्रयोगा’त नवी उंची गाठणारी ही माणसं पुन्हा आपल्याच मातीमध्ये येतात. तिथे नवे प्रयोग व्हावेत यासाठी झटतात तेव्हा उद्देश केवळ स्मरणरंजन नसतो.
नाट्यसंवेदनांचे ते अभिसरण असते. सांस्कृतिक अंगाने मरगळ तर आली नाही ना, अशी चाचपणीही त्यामागे असतेच. गेल्या चार वर्षांपासून सुरू असणाऱ्या जिगीषा नाट्यसहवास महोत्सवाने ती जाणीव आता पुढे सरकू लागली आहे. काही वर्षांपूर्वी सत्यदेव दुबे यांच्या नाटकांचा एक महोत्सव झाला होता. या महोत्सवात त्यांचे एक भाषण छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले होते. त्या भाषणाचा प्रभाव अनेक वर्षे कायम राहिल्याचे तत्कालीन कलाकार सांगतात. आता नाटकांचा तो विचार नव्या पिढीसमोर रत्ना पाठक-शाह यांनीही मांडला आणि नाटकाचा विचार करणारी माणसं नक्की कसा आणि काय विचार करतात, याचा नव्या पिढीसमोर उलगडा झाला.
अभिव्यक्तीला कुंपण असू नये, असे मानणारे कलाकार एकत्र आले की नव्या प्रारूपावर चर्चा होते. जिगीषा नाट्यसहवास उपक्रमात ती गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. काही जुनी नाटके आजही कसे संदर्भहीन नाहीत, हे सांगत काही नाट्यप्रयोग या महोत्सवात झाले. ‘वाडा चिरेबंदी’, ‘चारचौघी’चा प्रयोग झाल्यानंतर या वर्षी या महोत्सवात ‘सवाल-जवाब’चा प्रयोग अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीची जागृती वाढविणारा होता.
काही नाटककार – लेखक यांच्याशी होणारा संवाद या सदरात अजित दळवी यांची मुलाखत, परिसंवादामध्ये माध्यम रूपांतर याविषयाच्या अनुषंगाने मांडलेले अतुल पेठे यांचे विचार, असा मोठा पैस कवेत घेणाऱ्या या महोत्सवातून दरवर्षी मिलिंद सफई यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो. नोकरी करून नाटकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मिळणारा हा पुरस्कार या वर्षी लेखक आणि अभिनेता योगेश शिरसाठ यांना देण्यात आला. केवळ नाटक दाखवणे, पुरस्कार देणे यापेक्षाही पुढे जाता यावे आणि नाट्यसंवेदना जागृत ठेवण्याचा भाग म्हणून नाटक आणि नाटकांचा भोवताल सांगणााऱ्या पुस्तक प्रदर्शनामुळे या महोत्सवात नवी भर पडते आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नाटयविषयक पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकेही विकत घेतली जाऊ लागली आहेत. नाटक वाचणे, त्याचे अभिवाचन करणे, ते सादर होताना बघणे, नाटक घडतानाच्या प्रक्रियेवर चर्चा होणे, त्यातील कलावंतांना भेटणे असा उत्सव मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे या महोत्सवाचा प्रतिसाद वाढतो आहे. एरवी नाटक बघायला येणारा मध्यमवर्गीय आणि मध्यमवयाच्या व्यक्तींपेक्षा तरुणांची गर्दी आता नाटकाकडे वाढते आहे.
‘तोत्तोचान’ किंवा ‘हॅनाची सुटकेस’, ‘ठकीशी संवाद’, ‘हंडाभर चांदण्या’ अशी वेगळ्या विषयावरची नाटके पाहण्यासाठी लोक गर्दी करतात तेव्हा सांस्कृतिक जाणिवा वाढीस लागण्यास मदत होत असते. ही जाणीव आता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झिरपत जावी, या प्रयत्नांना ‘मराठवाडा आर्ट कल्चर ॲण्ड फिल्म फाऊंडेशन’ आणि ‘महात्मा गांधी मिशन’सारख्या संस्था बळ देत आहेत. एक पिढीने नाटक करण्यासाठी संघर्ष केला आता ती पिढी पुढच्या पिढीत नाटक झिरपत ठेवण्यासाठी झटत असल्याचे जिगीषा नाट्यसहवास उपक्रमातून प्रकर्षाने पुढे येते आहे. मुद्दा असेल आणि सांगण्यासारखी गोष्ट असेल तर नाटक सुरूच राहतं. एका पिढीकडे गोष्ट होती. ती पुढच्या पिढीला सांगितली जात आहे. गोष्ट सांगता यायला हवी तरच नाटक सुरू राहते. कारण, नाट्यसहवास आपल्याच जाणिवांचे प्रकटीकरण असते.
