scorecardresearch

जितेंद्र जोशीची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट; म्हणाला, “काका तू कायम राहणार आहेस…”

नुकतंच विक्रम गोखले यांनी ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती

जितेंद्र जोशीची विक्रम गोखलेंबद्दल भावूक पोस्ट; म्हणाला, “काका तू कायम राहणार आहेस…”
जितेंद्र जोशी आणि विक्रम गोखले

रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्र‌वाणी मालिका या तीनही माध्यमांतून आपल्या अभिनय कर्तृत्वाचा ठसा उमटवून, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले (वय ७७) यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. गेले काही दिवस विक्रम गोखले यांची प्रकृती नाजुक होती आणि पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परवा ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे वृत्तदेखील समोर आलं होतं, पण आज सकाळी त्यांची प्रकृती आणखी ढासळली.

विक्रम गोखले यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीने हळहळ व्यक्त केली आहे. कित्येक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नुकतंच विक्रम गोखले यांनी जितेंद्र जोशीच्या ‘गोदावरी’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती. हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटाचं कौतुक तर झालंच शिवाय यामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाचंही लोकांनी तोंडभरून कौतुक केलं. या चित्रपटाची निर्मिती करणारा आणि यात मुख्य भूमिका निभावणारा अभिनेता जितेंद्र जोशी याने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये त्याने विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने अगदी मोजक्या शब्दांत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जितेंद्र जोशी म्हणतो, “बादशहा माणूस!! त्याला अव्याहत काम करायला खूप जास्त आवडायचं. खूश असायचा कॅमेरा सुरू झाला की, रंगमंचावर उभा राहिला की राजा व्हायचा . भेटला रे भेटला की कवेत घ्यायचा, प्रेमाने मुके घेत भरभरून प्रेम केलं आम्हा सर्व मुलांवर. जे जे त्याला येत होतं ते सगळं शिकवण्याचा प्रयत्न केला . देत राहिला सगळी बुद्धी आणि जेजे स्वतः शिकला ते ते सगळं!! शेवटपर्यंत रुबाबदार राहिला आणि काम करत राहिला. विक्रम काका..तू कायम राहणार आहेस तुझ्या कामातून आणि आमच्याही! I love you forever..”

जितेंद्र जोशीची ही भावूक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शिवाय ‘गोदावरी’ चित्रपटातसुद्धा विक्रम गोखले आजारी असतानाही चित्रीकरण करत असल्याचं जितेंद्र जोशीने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसाह्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 10:04 IST

संबंधित बातम्या