डिस्ने आणि सोनीच्या वादाच्या ‘जाळ्यात’ अडकला स्पायडरमॅन

सुपरहिरो स्पायडरमॅन हा हॉलिवूड मनोरंजन सृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेंपैकी एक आहे.

मंदार गुरव

मोठय़ा मुलांच्या खेळात काही वेळा एखाद्या लहान मुलाला खेळण्याची संधी मिळते. या वाढीव खेळाडूला कच्चा लिंबू असे म्हटले जाते. दोन्ही संघांत संतुलन राहावे, यासाठी खेळवल्या जाणाऱ्या या लिंबू टिंबू खेळाडूला एकाच वेळी दोन्ही संघांत खेळण्याची संधी मिळते. दरम्यान, या खेळाडूकडून दोन्ही ठिकाणी चांगल्या कामगिरीची अपेक्षादेखील ठेवली जाते. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत त्या लहानग्या खेळाडूचा जो गोंधळ उडतो. तसाच काहीसा गोंधळ सध्या सुपरहिरो स्पायडरमॅनचा उडालेला दिसतो आहे. तब्बल ४० दशलक्ष अमेरिकी डॉलरचा बाजारभाव व पाच दशकांचा इतिहास असलेल्या स्पायडरमॅनला आजही कच्चा लिंबूच समजले जाते, अशी खंत अभिनेत्री जोआन सेलिया ली हिने व्यक्त केली.

सुपरहिरो स्पायडरमॅन हा हॉलीवूड मनोरंजन सृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखेंपैकी एक आहे. म्हणूनच डिस्ने व सोनी या दोन मोठय़ा चित्रपट कंपन्या स्पायडरमॅनला मिळवण्यासाठी गेले अनेक वर्षे एकमेकांबरोबर आर्थिक द्वंद्व करत आहेत. या लढाईमुळे स्पायडरमॅनला एकाच वेळी दोन गटांत खेळण्याची कसरत करावी लागते आहे, मात्र जबरदस्त कामगिरीनंतरही त्याला कच्च्या लिंबूचीच वागणूक दिली जात असल्याची खंत जोआन सेलिया ली हिने व्यक्त केली.

जोआन सेलिया ली ही माव्‍‌र्हल सुपरहिरोंचे निर्माता स्टॅन ली यांची मुलगी आहे. १९६२ साली स्टॅन ली यांनीच स्पायडरमॅनची निर्मिती केली होती. स्पायडरमॅन हा त्यांच्या सर्वात आवडत्या सुपरहिरोंपैकी एक होता. परंतु ९०च्या दशकात आर्थिक टंचाईमुळे त्यांना स्पायडरमॅनचे हक्क सोनी कंपनीला विकावे लागले. स्टॅन ली यांचे गेल्याच वर्षी निधन झाले, परंतु गेली १० वर्षे त्यांची मुलगीच त्यांच्या वतीने माध्यमांसमोर येऊ न त्यांचे विचार मांडत होती. त्यामुळे चाहते स्पायडरमॅनवरील वादाबाबत तिचे मत जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. तिने नुकत्याच एका मुलाखतीमधून स्पायडरमॅनबाबत आपले मत मांडले.

स्पायडरमॅन हा लोकप्रिय सुपरहिरो आहे. म्हणूनच डिस्ने व सोनी या दोन कं पन्या त्याला मिळवण्यासाठी सतत भांडत असतात. या दोघांनीही त्याचा वापर करून कोटय़वधी डॉलर्स कमावले. परंतु तरीही या सुपरहिरोला त्याची अपेक्षित जागा मिळालेली नाही. कॉमिक्स व कार्टून मालिकांमध्ये संपूर्ण युनिव्हर्स हाताळणाऱ्या स्पायडरमॅनला माव्‍‌र्हलने त्यांच्या अ‍ॅव्हेंजर्स फौजेत अगदी नाईलाज म्हणून घेतले होते असे वाटत होते, तर दुसरीकडे सोनीनेदेखील एकाच कथानकावर पुन्हा पुन्हा चित्रपट तयार करून चाहत्यांना निराशच केले. स्पायडरमॅन काल्पनिक सुपरहिरो असला तरीदेखील चाहत्यांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. अनेकांचे बालपण स्पायडरमॅनबरोबर खेळण्यात गेले आहे. त्यामुळे डिस्ने व सोनी यांनी आपल्या आर्थिक नफ्याबरोबरच चाहत्यांच्या भावनांचाही विचार करावा, अशा शब्दांत जोआनने दोन्ही कंपन्यांना विनंती केली आहे. तिच्या या विनंतीला जगभरातील स्पायडरमॅन चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे.

खरंतर, अ‍ॅव्हेंजर्स एण्डगेमनंतर प्रदर्शित झालेल्या ‘स्पायडरमॅन फार फ्रॉम होम’ या चित्रपटालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. स्पायडरमॅनची कथा आता कुठे पुढे सरकली आहे. आणि भविष्यात कदाचित आयर्नमॅनची जागा तो घेईल आणि नवीन कारनामे करेल, असं चित्र चाहत्यांसमोर निर्माण केलं गेलं होतं. मात्र सध्या तरी या दोन कंपन्यांच्या लढाईत स्पायडरमॅनचं आणि तो साकारणाऱ्या टॉम हॉलंडचं भविष्यही पणाला लागलं आहे. टोबी मॅग्वायर आणि अँड्रय़ू गारफिल्ड यांच्यानंतर स्पायडरमॅनची भूमिका टॉमकडे आली. टॉमचे वय स्पायडरमॅनच्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे. टॉमला प्रेक्षकांनी स्पायडरमॅनच्या भूमिकेत स्वीकारलंही आहे. आणि अ‍ॅव्हेंजर्सच्या फौजेत दाखल झाल्यामुळे त्याच्या क थेला वेगळे परिमाणही मिळाले आहे. मात्र असे असूनही प्रेक्षकांना आपल्या सुपरहिरोला मुकावे लागणार की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबतीत खुद्द टॉमलाही प्रेक्षकांनी प्रश्न विचारले होते, मात्र त्यालाही याबाबतीत काहीच कल्पना देण्यात आलेली नाही. टॉमनेही याबाबत फारशी आशा दाखवलेली नाही. किंबहुना त्याने तर निर्मात्यांनी काहीही निर्णय घेतलेला असेल तो स्वीकारण्याची तयारीही केली आहे. आपल्याला कारकीर्दीत सुरुवातीलाच स्पायडरमॅनची भूमिका साकारायला मिळाली. इतकंच नाही तर अ‍ॅव्हेंजर्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली, यातच आपल्याला आनंद वाटत असल्याचे त्याने सांगितले. या संधीबद्दल आपण सोनी आणि माव्‍‌र्हलचे कायम ऋणी राहू, असेही टॉमने स्पष्ट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Joan celia lee spider man sony pictures walt disney company mppg

Next Story
‘सेक्रेड गेम्स २’ फेम अभिनेत्री गौराईच्या पूजेत रमते तेव्हा..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी