या जगात काही काही गोष्टी गृहीतच धरल्या गेल्या आहेत. म्हणजे पुनरोत्पादनासाठी स्त्री-पुरुष यांचीच जोडी असायला हवी. त्यामुळे त्या प्रकारचे शारीरिक संबंध यायला हवे असतील तर हे दोन घटक एकत्र यायला हवेत. त्यापायी स्त्री-पुरुष संबंध हेच जगभर ‘नॉर्मल’ आहेत असं सर्वसाधारणत: मानलं गेलं आहे. पण जगात त्यापलीकडचीही काही माणसं अस्तित्वात आहेत; ज्यांना या संबंधांपेक्षा वेगळे संबंध आकर्षित करतात… खुणावतात. जसे की, पुरुष-पुरुष संबंध, स्त्री-स्त्री संबंध, एखाद्याला पुरुष-स्त्री संबंधांबरोबरच पुरुषाबरोबरचे संबंधही आकर्षित करत असतात. कुणाला तृतीयपंथीयांशी संबंध ठेवावेसे वाटू शकतात. अशा ज्याच्या त्याच्या लैंगिक गरजा आणि कलानुसार त्या त्या व्यक्तीला जगावंसं वाटत असतं. पण ते आपल्याकडे ‘नॉर्मल’ समजलं जात नाही. त्यातून अशा अल्पसंख्य असलेल्या व्यक्तींकडे विकृत म्हणून पाहिलं जातं. घरादारासह कुणीही अशांना स्वीकारायला तयार होत नाही. त्यांचं जगणं मुश्कील होतं. कायद्यानंही त्यांना आधार मिळत नाही. मग त्यांनी जगायचं कसं? आपल्या नैसर्गिक भावना कायम दडपतच? पण अशानंच तर समाजात विकृती निर्माण होते ना. पण लक्षात कोण घेतो? तर ते असो. यासंबंधांत आजवर जगभरात अनेक कलाकृती निर्माण झाल्या आहेत… होत आहेत… यापुढेही होतील. पण मराठीत अशा विषयावर अभावानंच लिहिलं, बोललं जातं. विजय तेंडुलकरांनी ‘मित्राची गोष्ट’मध्ये या विषयाला स्पर्श केला होता. मात्र, तरीही हा विषय ‘अब्रह्मण्यम’ म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे त्याला साहित्य वा अन्य कलांतूनही अभावानंच हात घातला जातो. अशात चैतन्य कुलकर्णी लिखित आणि श्रेयस इंदापूरकर दिग्दर्शित ‘जोडीचा मामला’ हे या विषयावरचं एक रंजक नाटक रंगभूमीवर आलेलं आहे. एका आटपाट गावातील तन्वी आणि गायत्री या दोन मुली शिक्षणासाठी शहरात जातात आणि तिथं त्यांच्या लक्षात येतं, की आपल्याला एकमेकींबद्दल आकर्षण वाटतंय. त्यातून त्यांना आपण एकत्र सहजीवन जगावं असं वाटू लागतं. पण हे घरच्यांना सांगायचं कसं? आपण एक वेळ स्त्री-पुरुष असतो तर गोष्ट वेगळी. पण समाजमान्यतेच्या बाहेर जाऊन परस्परांविषयीचं हे आकर्षण घरच्यांना, समाजाला कसं समजावून सांगणार? पण त्याचदरम्यान अचानक एक संधी चालून येते. गावाला तंटामुक्ती योजनेत पुरस्कार मिळण्यासाठीच्या स्पर्धेत पाहणी करण्याकरता जगदाळे नावाचा एक शासकीय अधिकारी गावात येतो. साहजिकच गावचे सरपंच असलेल्या अण्णासाहेब वाघचौरेंच्या (गायत्रीच्या) घरी त्यांचा मुक्काम पडतो. याच गोष्टीचा फायदा घ्यायचं त्या दोघी ठरवतात. आमचं एकमेकींवर प्रेम आहे आणि आम्हाला याच आठवड्यात लग्न करायचंय असं तन्वी आणि गायत्री आपापल्या घरी ठामपणे सांगतात. तंटामुक्ती अधिर्का याच्या उपस्थितीत आपले आई-वडील आपल्याला विरोध करू शकणार नाहीत, धिंगाणा घालू शकणार नाहीत असा त्यांचा कयास असतो. आणि दोन्ही घरच्यांंच्या नाइलाजास्तव तसंच घडतं. घरच्यांचा आणि गाववाल्यांचा या लग्नाला मनातून तीव्र विरोध असूनही त्यांच्या लग्नाला कशीबशी संमती दिली जाते. पण अर्थात ती मोठ्यांनी लढवलेली एक क्लृप्ती असते. प्रत्यक्ष लग्नात गायत्रीचं ज्याच्याशी पूर्वी लग्न ठरलेलं असतं त्या मुलाला- पवनला वर म्हणून उभं करायचा असा अण्णासाहेबांचा बेत असतो. परंतु तो बेत या दोघी हाणून पाडतात. मात्र, त्यानंतर त्यांचं लग्न लागतं का, या प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्ष नाटकात शोधणंच उचित.

लेखक चैतन्य कुलकर्णी यांनी समलैंगिकतेचा हा प्रश्न हसत खेळत आणि बाळबोध पद्धतीने यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे असं की तन्वी आणि गायत्रीचे आई-वडील म्हणावं तितक्या गांभीर्यानं या समस्येकडे पाहताना दिसत नाहीत. त्यामुळे मुळातच फारसा संघर्ष उभा राहत नाही. जो काही उभा राहतो तो तद्दन लुटूपुटूचा. तोही तंटामुक्त गाव स्पर्धेच्या अधिर्का यामुळे असंही फारसं दिसत नाही. त्यामुळे ही गमतीगमतीत सांगितलेली गोष्ट वाटते. त्याचा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. शिवाय वैविध्यपूर्ण लैंगिक संबंधांचं बाळकडू पाजण्यासाठी जॅकी आणि रंगीतराव अशी दोन पात्रं यात निर्माण केली गेली आहेत. त्यातल्या एका पात्राचं प्रयोजन कळतं; पण दुसर्याचं काय? बरं, हा विषय हसत खेळत मांडला… इथपर्यंत ठीक आहे. मग तो तडीस न्यायला नको? तन्वीच्या भूमिकेत शेवटी झालेला बदल काय सुचवतो? गायत्रीही शेवटी म्हणते खरी… की आम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येऊ… म्हणजे नेमकं काय करणारेत दोघी? याचा सरळ अर्थ… नाटककर्त्यांना वास्तवाला सामोरं जायची भीती वाटली. मग तुम्ही मुळात हा घाट घातलातच का, हा प्रश्न उरतो. असो.

दिग्दर्शक श्रेयस इंदापूरकर यांनी लेखकाकडून काही गोष्टी स्पष्ट करून न घेता नाटक बसवलं आहे. संहितेशी बहुतांशी प्रामाणिक राहून त्यांनी पात्ररचना, प्रसंग रेखाटन केलं आहे. त्यामुळे अस्थानी विनोदनिर्मिती वगैरे गोष्टी घडल्या आहेत. बरं, इतक्या पात्रांची जत्रा भरवायचं कारण काय, हे कळत नाही. तंटामुक्त अधिकार्‍याचं काम काय, हेही समजत नाही. त्याचाही वापर योग्य प्रकारे केला गेलेला नाही. त्यातल्या त्यात तन्वी आणि गायत्रीची एकमेकींबद्दलची ओढ मात्र नेमकेपणानं दाखवली गेली आहे. संदेश बेंद्रे यांनी गाव उभं करताना तिथं देवळाचं प्रयोजन काय, हे कळत नाही. त्यापायी रंगमंचीय अवकाश आक्रसला गेला आहे. शीतल तळपदेंची प्रकाशयोजना प्रसंग ठळक करते. चैतन्य कुलकर्णी यांनी संगीताची बाजू मात्र आकर्षक केलीय. ऋषिकेश देसाई यांची नृत्यंही प्रशंसनीय. उल्लेश खंदारे यांची रंगभूषा आणि प्राची कात्रे व श्रद्धा हांडे यांची वेशभूषा नाट्यपोषक. पायल साळुंके यांची गायत्री खमकी आणि आपल्या प्रेमाबद्दल स्पष्टता असलेली वाटते. याउलट, श्वेता काजळे यांची तन्वी काहीशी धरसोड वृत्तीची, आपल्या निर्धारावर ठाम नसलेली वाटते. यात मधल्या मध्ये बळीचा बकरा बनलेला पवन- वैभव महाले यांनी छान साकारला आहे. सरपंच अण्णासाहेब झालेले योगेश कदम यांची त्रेधातिरपीट बघण्याजोगी. प्राची कात्रे यांनी गायत्रीच्या आईची घुसमट, चिडचीड अधेमधे दाखवलीय. अश्विनी माळी यांनी गायत्रीच्या अविवाहित आत्येची तगमग नेमकेपणानं हेरलीय. तन्वीचे बाबा झालेल्या प्रदीप कसबे यांनी त्यांची व्यथा उत्कटतेनं पोहोचवलीय. विशाल दुराफे (तंटामुक्ती अधिकारी), विनायक जाधव (माणिक), अभिजीत पाटसकर (रंगीतराव), श्रेयस इंदापूरकर (जॅकी), दुर्गेश लांडगे (गुण्या) आणि आकाश राठोड (गोविंदा) यांनी आपापल्या भूमिका चोख साकारल्या आहेत.