अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियाद्वारे स्टार किड्सवर जोरदार टीका होत आहे. त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. या घराणेशाहीच्या वादात आता अभिनेता जॉन अब्राहम याने उडी घेतली आहे. “एकतर काम करा किंवा घरात बसून दुसऱ्यांवर टीका करा”, असं प्रत्युत्तर त्याने टीकाकारांना दिलं आहे.

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत जॉनने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक व्यक्तीला स्ट्रगल हे करावंच लागतं. स्टार किड्सला देखील चित्रपट उद्योगात टिकून राहण्यासाठी मेहनत करावीच लागते. अन्यथा प्रेक्षक त्यांना दिर्घकाळ सहन करत नाही. तुमच्याकडे दोनच पर्याय असतात, करिअर करायचं असेल तर घराबाहेर पडा आणि काम करा. किंवा घरात बसून इतरांवर टीका करा. मी पहिला पर्याय स्विकारला. मॉडलिंग करुन मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी मी एक आऊटसायडर होतो. आज जवळपास २० वर्ष मी काम करतोय. अडथळे तर येतातच पण तक्रारी करुन काहीही सिद्ध होत नाही.” अशी प्रतिक्रिया जॉन अब्राहम याने दिली.

यापूर्वी सोनू निगम याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन नव्या कलाकारांसोबत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. “अभिनय क्षेत्रात घराणेशाही तर आहेच, परंतु ही परंपरा आता संगीतच्या दुनियेतही सुरु झाली आहे. दिग्दर्शक, निर्माता तयार असतानाही अनेक नव्या कलाकारांना संगीत कंपन्यांच्या मक्तेदारीमुळे काम मिळत नाही. हा प्रकार त्वरित थांबवा अन्यथा आता संगीत क्षेत्रातही आत्महत्या सुरु होतील अशी भीती मला वाटतेय.” असे विचार सोनू निगम याने व्यक्त केले होते.