बॉलीवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर सध्या चर्चेत आहे. तिने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून समोरच्या व्यक्तीला नक्कीच राग येईल.
खरं तर जेमीने अलीकडेच एक मुलाखत दिली होती, त्यातील काही गोष्टी व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या त्वचेच्या रंगामुळे तिला ट्रोल करण्यात आले होते. तिने सांगितले की, लोक तिच्या दिसण्यामुळे तिला ‘चेटकीण’ म्हणू लागले आणि तिला गोरा होण्याचा सल्ला दिला जात होता.
जेमीने हॉटरफ्लायला सांगितले, “मला खूप कमेंट्स येत असत. काळी आहे, चेटकीण दिसते, चेटकिणीसारखी हसते, तू चांगली दिसत नाही, तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही, तू मरत का नाहीस, तुझ्या दिसण्यामुळे तुला काम मिळत नाही… मला आयुष्यभर हे सर्व ऐकावे लागले.”
जेमी पुढे म्हणाली, “माझ्या रंगामुळे मला खूप बोलायचे. मोठे झाल्यावर लोक मला उटणे, हळद लावायला आणि गोरे होण्यास सांगायचे… आपल्या देशात त्वचेचा रंग हीच एक मोठी समस्या आहे.”
पॉडकास्टदरम्यान जेमीने हे देखील उघड केले की, ती मोठी होत असताना तिच्या शरीराबद्दल तिला लाज वाटायची आणि असुरक्षित वाटायचे, कारण ती खूप जाड होती. जेमी म्हणाली, “लोक माझ्याकडे पाहायचे आणि मला वाईट बोलायचे. माझ्या कुटुंबानेही मला माझी लोअर बॉडी झाकून ठेवायला सांगितले. मी जाड आहे, मग मी त्याबद्दल काय करू?”
तसेच, जेमीने तिच्याबरोबर लहानपणी घडलेला एक प्रसंग सांगितला. त्यावेळी ती म्हणाली, “मी तेव्हा मुंबईतील विलेपार्ले येथील जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होते. शाळा सुटल्यानंतर एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीबरोबर गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. त्यावेळी आमचा ड्रायव्हरदेखील बरोबर होता आणि तेव्हा आम्ही माझ्या भावाची वाट पाहत होतो. त्यानंतर एक माणूस गाडीजवळ आला, त्याने त्याची पँटची चेन उघडली आणि अश्लील कृत्ये करू लागला. त्यावेळी मी फक्त १०-१२ वर्षांची होते आणि इतकी घाबरले होते की मला काय करावं हे कळत नव्हतं. मला वाटलं तो गाडीचा दरवाजा उघडेल, या भीतीने मी घाबरले, थरथर कापत होते. मी शांतपणे दार लावून घेतलं. मग आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर तो निघून गेला.”
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर जेमी ही स्टँड-अप कॉमेडी सर्कलमध्ये एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिचे कॉमिक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप पसंत केले जातात. तिने २०१५ मध्ये कपिल शर्माबरोबर ‘किस किस को प्यार करूं’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ‘हाऊसफुल ४’, ‘भूत पोलिस’, ‘यात्री’ आणि ‘क्रॅक’ या चित्रपटांमध्येही दिसली.