जे. पी. दत्ता दिग्दर्शित 'पलटन' हा चित्रपट अभिषेक बच्चनसाठी पुनरागमनाची सुवर्णसंधी ठरली असती. मात्र ऐनवेळी त्याने चित्रपटातून काढता पाय घेतला. इतकंच नव्हे तर नकार देण्यामागचं कारणसुद्धा त्याने दिग्दर्शकांना कळवण्याची तसदी घेतली नाही. गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यावेळी जे. पी. दत्ता यांना अभिषेकविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तुम्ही त्यांनाच जाऊन कारण विचारा आणि मग मलासुद्धा सांगा, कारण अभिषेकने चित्रपटाला ऐनवेळी का नकार दिला हे मलाही माहित नाही, असं ते म्हणाले. दत्ता यांच्या 'रेफ्युजी' या चित्रपटातूनच अभिषेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'LOC कारगिल' आणि 'उमराव जान' या चित्रपटांसाठीही दोघांनी एकत्र काम केलं. 'पलटन'मध्ये भूमिका साकारण्यासाठी अभिषेकने सुरुवातीला होकार दिला होता. मात्र शूटिंग सुरू होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्याने काढता पाय घेतला. त्यामागचं कारणसुद्धा दिग्दर्शकांना कळवलं नाही. वाचा : सोनालीच्या तब्येतीत सुधारणा; पतीने दिली माहिती 'पलटन'मध्ये अभिषेकच्या जागी हर्षवर्धन राणेला घेण्यात आलं. भारतीय आणि चीन सैन्यादरम्यान १९६७ मध्ये झालेल्या नथु ला आणि चो ला या संघर्षावर 'पलटन'ची कथा आधारित आहे. यामध्ये जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल, सोनू सूद, गुरमीत चौधरी, सिद्धार्थ कपूर यांच्या भूमिका आहेत. जे. पी. फिल्म्स निर्मित आणि झी स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.