दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व चित्रपट निर्माते एस. एस. राजामौली यांनी २०२३ साली ‘मेड इन इंडिया’ या चित्रपटाची घोषणा केली होती. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करीत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. या व्हिडीओमधून भारतात आजवर अनेक चरित्रपट बनले; पण हा भारतीय सिनेमाचा चरित्रपट आहे, असं म्हटलं गेलं होतं. ‘मेड इन इंडिया’ असं या चरित्रपटाचं नाव असून, तो भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित आहे.
अशातच आता यासंबंधित नवीन माहिती समोर आली आहे. ‘मेड इन इंडिया’ या चरित्रपटामध्ये ज्युनियर एनटीआर दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार एस. एस. राजामौली, वरुण गुप्ता, एस. एस. कार्तिकेय यांनी या चरित्रपटाची घोषणा केली तेव्हापासून लिखाणाचं काम सुरू होतं. आता ते पूर्ण झालं असून, त्यांनी नुकतंच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरला यासाठी विचारलं होतं.
ज्युनियर एनटीआरनं स्क्रिप्ट वाचताच त्यासाठी होकार दिला असून, तो मोठ्या पडद्यावर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची भूमिका साकारण्यासाठी तयार असल्याचं ‘पिंकव्हिला’नं म्हटलं आहे. ‘मेड इन इंडिया’मुळे ज्युनियर एनटीआरला अॅक्शनव्यतिरिक्त आजवर त्यानं न केलेलं काहीतरी वेगळं काम करण्याची संधी मिळत आहे.
‘मेड इन इंडिया’ या चरित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कक्कर करणार आहेत. तर एस. एस. राजामौली, वरुण गुप्ता, एस. एस. कार्तिकेय हे तिघे याची निर्माती करणार आहेत. लवकरच चित्रपटाचं काम सुरू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, ज्युनियर एनटीआरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या दिग्दर्शक प्रशांत नीलसह एका अॅक्शन चित्रपटाचं चित्रीकरण करीत आहे. त्यानंतर तो नेल्सन दिलीपकुमार यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहे. यासह त्याने आजवर ‘आर.आर.आऱ.’, ‘देवरा पार्ट १’, ‘रभासा’, ‘अरविंद समेथा वीरा राघवा’, ‘जय लावा कुसा’, ‘जनता गॅरेज’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तर ज्युनियर एनटीआर त्याच्या अॅक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. पण ‘मेड इन इंडिया’मुळे तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.