टेक्सास : अमेरिका. एका शाळेतील प्राथमिक तुकडीचा एक वर्ग. मुलं चित्रकलेच्या तासाला चित्रं काढताहेत. शिक्षिका त्यांचं निरीक्षण करतेय. एवढ्यात एक माथेफिरू त्या वर्गात घुसतो आणि अंदाधुंद गोळीबार करतो. त्यात नील नावाचा मुलगा आणि आणखी काही जण ठार होतात. ती शिक्षिका त्या अकस्मात घडलेल्या घटनेनं सुन्न होते. त्या धक्क्यानं ती नैराश्यात जाते. माणसाच्या जगण्याला काही अर्थच नाहीए, या विचारानं ती हताश, हतबल होते. ती शिक्षिका आहे – सौदामिनी. आयुष्यातील अशाच प्रकारच्या याआधीच्याही काही अतर्क्य आघातांनी ती ध्वस्त झालीय. आपल्याच आयुष्यात अशा दुर्दैवी घटना वारंवार का घडतात, या प्रश्नानं ती बेचैन झालीय. आपलं हे आयुष्यच संपवून टाकावं या निर्णयाप्रत ती आलीय.
भारतातील तिच्या सुहृदाकडे – डॉ. समीरकडे आपली ही व्यथा-वेदना ती व्यक्त करते. तो तिला परोपरीनं समजावण्याचा बराच प्रयत्न करतो. तिची भयाण अवस्था त्याच्या लक्षात येते. तो तिला भारतात परत यायला कळकळीनं विनवतो. ती त्या विमनस्क अवस्थेत भारतात येते. समीर तिची बरीच समजूत काढूनही ती त्या विकल अवस्थेतून बाहेर येत नाही. जणू तिनं आपली सारी कवाडं बंद करून घेतलीयत. त्या मनोवस्थेतून बाहेर काढण्यासाठी समीर तिला वारीला येतेस का, म्हणून विचारतो. पण तिला आता कशातच रस उरलेला नसतो. ती नकार देते. पण तिच्या एकटेपणाच्या कोशातून बाहेर पडायचं असेल तर आयुष्याला सामोरं जायलाच हवं असं तो तिला परोपरीनं बजावतो. तो आपल्या दिॅडी प्रमुख बाबांना तिला भेटावयास नेतो.
ती नाइलाजानं दिंडीला यायला तयार होते. पण तिचं मन-मस्तिष्क तिच्यासोबत नसतं. ती दिंडीत सामील होते खरी, पण कोरड्या अलिप्तपणानं. तिचं सगळं कुटुंब ती कॉलेजमध्ये असताना अपघातात गेलेलं असतं. तिची एक जवळची मैत्रीण अकाली कॅन्सरने गेलेली असते. आणि आता नील… तिचा लाडका, संवेदनशील विद्यार्थी माथेफिरूच्या गोळीबाराला बळी पडलेला असतो. या सगळ्या आघातांनी ती पार कोलमडून गेलेली असते. आपल्या आयुष्यात काहीच चांगलं घडू शकत नाही, ही तिची एव्हाना खात्रीच पटलेली असते. म्हणूनच आता तिला आपलं आयुष्य अगदी नकोसं झालेलं असतं.
समीरच्या आणि कीर्तनकार बाबांच्या आग्रहाखातर ती वारीत सामील झालेली असते खरी; पण फक्त शरीरानं. आपल्याला पडलेले प्रश्न ती बाबांना विचारते. ते त्याची ता्त्विवक उत्तरं देतातही; पण ती तिच्या तर्कबुद्धीला पटत नाहीत. दिवस उलटत असतात. पण तिच्या मनावरचं मळभ काही केल्या हटत नाही.
आणि एके दिवशी एक कुत्रा अचानक तिला वाटेत भेटतो. का कुणास ठाऊक, तिला त्याच्याबद्दल दया, करुणा, आपुलकी वाटते. ती त्याला आंजारते-गोंजारते. तोही निरागसपणे तिला प्रतिसाद देतो. काही क्षण तो तिला कृतज्ञ सोबतही करतो. तिला प्रथमच भावनेचा ओलावा जाणवतो.
पुढे एके ठिकाणी एका बापाच्या खांद्यावरून वारीत सामील झालेला कान्हा नावाचा लहान मुलगा तिचं लक्ष वेधून घेतो. त्याचं निर्मळ निष्पापपण तिला भावतं. त्या बाप-लेकातलं नितळ नातं तिला स्पर्शून जातं. लौकिकाची अलौकिकाशी गाठ पडल्यासारखं तिला वाटतं. वारीतलं असं काहीतरी तिला त्यांच्यात सापडतं, की ती हळूहळू मनानं वारीत सामील होऊ लागते.
पुढच्या एका टप्प्यावर तिला सडकून ताप भरतो आणि ती ग्लानी येऊन कोसळते. समीर तेव्हा पेशंटवर उपचार करण्यासाठी शहरात परतलेला असतो. ती जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा तिला एक बाई आपल्याला पाठुंगळीला घेऊन चाललीय हे तिच्या लक्षात येतं. तिला काहीच कळत नाही. ती बाई आणि तिचा पाय फरफटत मागून येणारा नवरा तिला डॉक्टरांकडे घेऊन चाललेले असतात. ती ‘आता आपण बरे आहोत, मी चालू शकते’’ असं म्हणून चालत जायचा आग्रह धरते. पण मुळात तिच्या पायांत त्राणच उरलेलं नसल्यानं ते अशक्य होतं. ती दोघंजणं तिला डॉक्टरांकडे घेऊन जातात.
तिथं डॉक्टर त्या बाईकडे ‘ही कोण?’ अशी विचारणा करतात. तेव्हा ती ‘माझी धाकली बहीण’ असं उत्तर देते. त्या उत्तरानं सौदामिनी चकित होते. ही कुणाची कोण, आपल्याशी बहिणीचं नातं जोडतेय… यानं तिला अक्षरश: भरून येतं. आतापर्यंत आपल्याच कोशात बंदिस्त झालेलं, कोंडलेलं तिचं मन अकस्मात मोकळं होतं. मनावर आजवर दाटलेलं मळभ अलवारपणे बाजूला होतं. दृष्टी स्वच्छ, नितळ होते. माणुसकीच्या नात्याची खूण पटते. आणि खरोखरीच आपलं यांच्याशी काहीतरी आतड्याचं नातं आहे याची तिला प्रथमच जाणीव होते. तिचं आजवरचं एकटं, एकलेपण हळूहळू वितळायला लागतं.
पुढं वारीत असे एकेक अनुभव येत जातात, की ती तिच्याही नकळत हळूहळू माणसात येत जाते. आपल्या जगण्याबद्दल, आपल्या अस्तित्वाबद्दल आतापर्यंत तिला पडलेले सगळे नकारात्मक प्रश्न विरघळत जातात. तिच्यातलं हरवलेलं ‘माणूस’पण जागं होतं. जगण्याला पुनश्च सामोरी जायला ती सज्ज होते…
लेेखक डॉ. समीर कुलकर्णी यांनी एका व्यक्तीच्या स्वशोधाची ही कथा अत्यंत ठाय लयीत ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’मध्ये प्रत्ययकारीतेनं मांडली आहे. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या शीर्षकातून ही काहीतरी आध्यात्मिक, भक्तीपर गोष्ट असावी अशी कुणाचीही समजूत होईल. पण ती त्यापलीकडे जाऊन साक्षीत्वानं माणसाच्या जगण्याची, त्याच्या आत्मभानाची गोष्ट सादर करते. फक्त त्याच्या पार्श्वभूमीदाखल वारी, विठ्ठल, अध्यात्म वगैरे येतात, एवढंच. तसा त्यांचा संबंध आहेही आणि नाहीही. यातल्या सौदामिनीला पडलेले प्रश्न तुम्हा-आम्हा कुणालाही पडू शकतात. त्यांची उत्तरं आपण आपल्या बुद्धी, मन, आकलन, अनुभव यांच्यामार्फत (बहुधा) शोधत असतो. कधी ती मिळतात. कधी नाही मिळत. इथे आपल्याला विज्ञानवादाच्या विपरीत काही पाहावं लागणार की काय, अशी काहीशी भीती वाटत असताना प्रत्यक्षात वास्तवाची कास न सोडता माणसाला पडर्णा या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक या आविष्कारात केलेली आढळते. आत्मज्ञान हेच सगळ्या प्रश्नांवरचं अंतिम उत्तर आहे हे त्यातून मनावर ठसतं.
लेखकाची कथनशैली अत्यंत प्रभावी आहे. माणसाच्या जगण्याचा, त्याला पडर्णा या प्रश्नांचा उभा-आडवा छेद त्यांनी यात घेतला आहे. त्यांची भाषाशैली, त्यातली चपखल शब्दयोजना, प्रवाहीपण आणि ओघ आपल्याला धरून ठेवतो. एका उचित तटस्थतेनं माणसाच्या जगण्याकडे लेखकानं पाहिलं आहे. तरीही त्यात कुठंही बिलकूल कोरडेपण आलेलं नाही. आणि वाहवलेपणदेखील दिसत नाही. विठुमाऊली, संतसज्जनांचं मोठेपण, त्यांचे विचार, भक्ती परंपरा वगैरे अनुषंगानं यात येत असलं तरी ते प्राथम्यक्रमावर नाही. माणसाचं जगणं हेच इथं केन्द्रस्थानी आहे.
दिग्दर्शक अमित वझे यांनी ही गुंफण फार अप्रतिमरीत्या साधली आहे. वरकरणी विठ्ठलभक्तीचा मुलामा असला तरी शोध माणसाच्या आत्मभानाचा आहे याचा विसर त्यांनी स्वत:ला क्षणभरही पडू दिलेला नाही. यासाठी अभंगांची निवड, ते कितपत वापरावेत याचं सम्यक भान त्यांनी ठेवलं आहे. कलाकार निवडीतही ही चपखलता दिसून येते. हे अभिवाचन आहे आणि सादरीकरणही आहे याचा तोल त्यांनी उत्तम साधलाय. सर्वांच्या परिचयाच्या अभंगांना वेगळ्या चाली देण्याची त्यांंची समर्पकता लक्षणीय. तांत्रिकतेचा बडिवार न माजवता तिचं अस्तित्व जाणवेल इतपत ती आहे. चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या चित्रांचा समर्पक वापर या रंगाविष्काराला खोली आणि आशयघनता प्रदान करतो.
जयदीप वैद्य आणि निनाद सोलापूरकर यांचं संगीत या सादरीकरणाचा मोलाचा ठेवा आहे. त्याचं आगळेपण प्रत्यक्ष अनुभवावं असंच. विशेषत: कबीराचा अभंग तर लाजवाबच. सुजय भडकमकर यांची प्रकाशयोजना या आविष्काराची रंगत वाढवते.
मधुराणी गोखले यांनी सौदामिनीचा नैराश्यग्रस्ततेपासून वारीतल्या अनुभवांतून माणूसपणाकडे होणारा तिचा प्रवास अविस्मरणीय केला आहे. भावभावनांचे तीव्र आंदोळ, त्यातल्या असंख्य छटा त्यांनी ज्या उत्कटतेनं अभिनित केल्या आहेत, त्याला ‘हॅट्स ऑफ’ म्हणण्यावाचून दुसरा पर्यायी शब्द नाही. सौदामिनीच्या व्यक्तिमत्त्वात त्या शब्दश: विरघळून गेल्या आहेत. डॉ. समीरची समजूतदार भूमिका आणि निवेदकाचं भान अमित वझे यांनी संतुलित अभिनयातून चोखपणे पेललंय. त्यांचा समंजस भाव, परिपक्वता निश्चितच आपला प्रभाव पाडून जाते. त्यामानाने गजानन परांजपे यांनी साकारलेल्या वारीप्रमुख बाबांना संहितेनं तितकासा आधार दिलेला नाही. अंजली मराठे यांनी शांताईची भूमिका आणि गायनाची बाजू तोलामोलानं सांभाळली आहे.
केतन पवार यांनी कान्हाच्या बापाचं अघळपघळपण आणि ढोलकीचा ताल तितक्याच सफाईनं राखला आहे. पार्थ उमराणी यांनी अभंग गायनाचा भार आणि कबीराचं भणंगपण आपल्या खुल्या, मोकळ्या गळ्यातून सर्वार्थानं पोहचवलं आहे. शौनक कुलकर्णी, स्वप्नील भावे, ओंकार जोशी यांनीही उत्तम संगीतसाथ केली आहे. एका सुघड जीवनानुभवाचा ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’च्या रूपात घातलेला हा घाट कुणीही चुकवू नये असाच आहे.
