आताच्या पिढीला शिवकुमार हे फक्त अभिनेता सूर्या व कार्तीचे वडील व ज्योतिकाचे सासरे म्हणून माहीत असतील. पण आधीच्या पिढ्यांसाठी ते उत्कृष्ट अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने जवळपास ३ दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शिवकुमार यांनी मोठ्या पडद्यावर अनेक गाजलेल्या भूमिका वठवल्या.
शिवकुमार उत्तम अभिनेतेच नाही, तर चित्रकाही आहे. चित्रकार व्हायचं हेच त्यांचं स्वप्न होतं. पण मॉडर्न आर्टमुळे त्यांना त्यांच्या कामाचे प्रदर्शन भरवण्यासाठी जागा मिळत नव्हती. त्यामुळे बऱ्याच जणांनी त्यांना सांगितलं की त्यांचं काम फार लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही. २०१७ मध्ये ते म्हणाले होते की, त्यांना त्यांच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी कॉलेजमध्ये केलेल्या एकपात्री नाटकाचा प्रयोग पाहून अभिनयात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता.
अभिनेता व्हायचा निर्णय योग्य ठरला – शिवकुमार
शिवकुमार यांनी आता पुन्हा त्यांचं चित्रकार व्हायचं स्वप्न आणि अभिनयातील प्रवासाबद्दल सांगितलं. चित्रकार न होता अभिनेता व्हायचा निर्णय फायद्याचा ठरला असं ते सांगतात. पण अभिनयक्षेत्रात आल्यावर लग्नासाठी मुलगी शोधताना खूप अडचण आली. कारण त्यावेळी अभिनेत्यांना एकापेक्षा जास्त बायका असल्याने लोकांचं त्यांच्याबद्दलचं मत फार चांगलं नव्हतं.
लग्न करायचंच नव्हतं – शिवकुमार
“सुरुवातीला मला लग्नच करायचं नव्हतं. मी आयुष्यभर अविवाहित राहायचं ठरवलं होतं. त्यानंतर मी मद्रासला (आताचे चेन्नई) आलो. मला चित्रकार व्हायचं होतं. मी कॉलेजमध्ये सहा वर्षे शिकलो आणि भारतातील सर्वोत्तम चित्रकारांपैकी एक झालो. माझं पुस्तकही प्रदर्शित झालं होतं. त्यावेळी मी फक्त २४ वर्षांचा होतो. त्यावेळी माझ्यासारखे २० चित्रकारही संपूर्ण देशात नव्हते,” असं जेएफडब्ल्यू अवॉर्ड्सच्या रेड कार्पेट सोहळ्यात बोलताना शिवकुमार म्हणाले.
“नंतर मला सांगण्यात आलं की मॉडर्न आर्टमुळे माझ्या चित्रांना फार व्हॅल्यू नसेल. या क्षेत्रात भविष्यच नाही, असं म्हटल्याने माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मग मी सिनेमात आलो. एमजी रामचंद्रन व शिवाजी गणेशन यशाच्या शिखरावर असताना मी फिल्म इंडस्ट्रीत आलो,” असं शिवकुमार म्हणाले.
अभिनेत्यांना २-३ बायका, कोणी मुलगी देत नव्हतं – शिवकुमार
चित्रपटसृष्टीत आल्यावर लग्न करण्यास खूप अडचणी आल्या, असं त्यांनी नमूद केलं. “मी जवळपास ३८ चित्रपट केले आणि मग लग्न करायचं ठरवलं. पण सिनेमात काम करत असल्याने कोणीच मुलगी देत नव्हतं. कारण कलाकारांना एकापेक्षा जास्त बायका असतात, असं लोकांना वाटत होता. जेमिनी गणेशन यांना दोन पत्नी होत्या, एमजीआर यांना तीन पत्नी होत्या, तर एव्हीएम राजन यांनाही दोन पत्नी होत्या. मुलीकडच्यांना वाटायचं की मीही असंच करेन. त्यानंतर एका व्यक्तीने मला आपली मुलगी लक्ष्मी कुमारी दिली. आम्ही लग्न केलं आणि आम्हाला सूर्या, कार्ती ही दोन मुलं आणि वृंदा ही मुलगी झाली,” असं शिवकुमार म्हणाले.
