scorecardresearch

ज्योती आमगे ‘बिग बॉस’च्या घरात

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रोकॉडर्स’मध्ये जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून नोंद झालेली ज्योती आमगे ही आता ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिचा प्रवेश झाला.

‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रोकॉडर्स’मध्ये जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून नोंद झालेली ज्योती आमगे ही आता ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये तिचा प्रवेश झाला. १ फूट ११ इंच एवढी कमी उंची असलेल्या ज्योतीच्या नावावर अनेक विश्व विक्रम असून निरनिराळ्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन तिने केले असल्यामुळे ‘बिग बॉस’च्या शोमधून ती प्रेक्षकांची आणि तेथील स्पर्धकांची मने जिंकेल, असा विश्वास तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
‘बिग बॉस सीझन ६’तील फॅशन स्टायलिस्ट इमाम सिद्दीकी याला घराबाहेरचा रस्ता दाखविल्यामुळे ज्योती आमगे हिला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. तिने या शोमध्ये सहभागी व्हावे, यासाठी तिला विचारणा करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव ती जाऊ शकली नव्हती. मूर्ती लहान, पण कीर्ती महान असलेल्या ज्योती आमगेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्यानंतर तिला बॉलिवुडमध्ये अनेक चित्रपट दिग्दर्शकांकडून विचारणा करण्यात आली होती. या शिवाय अमेरिका, जपान, लंडन, युरोप इत्यादी देशात जाऊन आली आहे. अमेरिकतील एका इंग्रजी चित्रपटात ज्योतीने काम केले आहे. ज्योती १९ वर्षांची असून सध्या बिंझाणी महिला महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत आहेत. दहावीला तिला ७३ टक्के गुण मिळाले होते. ज्योतीला चार बहिणी असून एक भाऊ आहे. ज्योती नुकतीच लंडनवरून परतली असून बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तिने तिरुपतीला जाऊन बालाजीचे दर्शन घेतले. दोन महिन्यापूर्वी बिग बॉसशी करार झाल्यामुळे जपानधील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वडील किसन आमगे यांनी दिली. ज्योती सलमान खानची चाहती असून उर्वशी व सपना या दोघी तिला आवडतात. तसेच बिग बॉसच्या घरातील सदस्य कसे राहतात, त्यांना बघण्याची माझी इच्छा होती, ती आता पूर्ण होत असून सर्वाना जास्तीत जास्त आनंद देण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे ज्योतीने सांगितले. बिग बॉस शोविषयी बोलताना ज्योती म्हणाली, हा शो पूर्वी बघत होत,े मात्र यात आपण सहभागी होऊ असे कधी वाटले नाही. संधी मिळाल्यामुळे या कार्यक्रमाचा आनंद घेणार आहे. बिग बॉसमध्ये सर्व मोठी माणसे आहेत त्यामुळे त्यांच्या सहवासात मला राहायला मिळणार आहे. देशविदेशात आणि इतरही ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असले तरी अभ्यास करीत असते. पुढच्यावर्षी बारावीची परीक्षा असल्यामुळे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणार आहे.   

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jyoti amge shortage girl of the world in big boss house