भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या 'काली' या माहितीपटावर जोरदार टीका होताना दिसत आहे. नुकतंच या माहितीपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं मात्र कालीमातेचा अपमान या माहितीपटाच्या पोस्टरमधून करण्यात आला दावा अनेकांनी केलाय. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. लिना यांनी सोशल मीडियावर नुकतंच त्यांच्या 'काली' या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं. लीना यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर जोरदार टीका होऊ लागली होती. या पोस्टरवर हिंदू देवतेच्या अवतारात एक महिला दिसत आहे. मात्र ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरवरील या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. यावरून अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत टीका केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लिना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. लिना मणीमेकल यांना अटक करा अशा अर्थाचा ‘#ArrestLeenaManimekal’ हा हॅटशॅग अनेकांनी वापरला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर लीना मणीमेकल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक ट्वीट करत या वादावरील आपली बाजू स्पष्ट केली आहे. आणखी वाचा- “आपल्याच गावी जाऊ शकत नसल्याचं दुःख…” उत्कर्ष शिंदेची पोस्ट चर्चेत लीना मणीमेकल यांनी लिहिलं, "माझ्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही. जी माणसं कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात त्यांना माझा नेहमीच पाठिंबा असतो. मी कोणालाही घाबरत नाही आणि याची किंमत जर माझं आयुष्य असेल तर मी तेही द्यायला तयार आहे. हा चित्रपट एका अशा घटनेची कथा आहे ज्यात एका संध्याकाळी कालीमाता प्रकट होते आणि टोरंटोच्या रस्त्यांवरून फिरू लागते. जेव्हा तुम्ही हा माहितीपट पाहाल तेव्हा मला अटक करण्याचे हॅशटॅग न वापरता मला प्रेम द्याल." दरम्यान हे पोस्टर पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी लिना यांच्याविरोधात पोस्ट केल्या आहेत. एका युजरने, “हिंदू भक्तांच्या भावना दुखावण्याचा हा मुद्दाम केलेला प्रयत्न आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य याचा अर्थ असा नाही की सर्जनशीलतेच्या नावाखाली तुम्ही काहीही कराल. हे डिजीटल माध्यमांवरही कसं प्रकाशित होऊ दिलं?, हे काढून टाका”, असं म्हटलंय. तर अन्य एकाने, “मी लिना मणीमेकल यांना विनंती करतो की हे पोस्टर काढून टाकावं, यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. समाजातील मोठ्या घटकाच्या भावनांचा सन्मान आगा खान संग्रहालयाकडून दाखवण्यात यावा,” असं म्हटलंय.