सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी २’ हा चित्रपट २ डिसेंबरला प्रदर्शित झाला. विद्या बालनची मुख्य भुमिका असणाऱ्या या चित्रपटाने कमाईच्या पार्श्वभूमीवर धीमी सुरुवात केली. मात्र आता पहिल्या दिवसाच्या थंड प्रतिसादानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६.९७ कोटींचा पल्ला गाठला आहे. विद्या बालन आणि अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने शुक्रवारी ४ कोटी २५ लाख इतकी कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत हलकीशी वाढ झालेली दिसली. शनिवारी ‘कहानी २’ ने ५ कोटी ७९ लाख इतकी कमाई केली होती. शनिवारी चित्रपटाच्या कमाईमध्ये तब्बल ३६.२४ टक्क्यांची वाढ झाली. रविवारी या चित्रपटाने १९.६९ टक्के इतका व्यवसाय करत ६.१९ कोटींची अधिक कमाई केली. ही चित्रपटाची आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘कहानी २’च्या कलेक्शनचा आकडा ट्विट केला आहे. हा चित्रपट भारतात फक्त १२३५ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
बॉक्स ऑफिसवर येणारे आकडे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत विद्या बालनने प्रेक्षकांनी ‘कहानी-२’ चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन चित्रपटातील मुख्य अभिनेत्री विद्या बालन हिने प्रेक्षकांना केले आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यास निराशा होते. चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती नसल्याचे सांगत प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घ्यावा, असे विद्या बालनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले. तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून हवी असल्यास ती गोष्ट मिळवून देण्यासाठी सृष्टी देखील तुमच्या बरोबर असते. त्यामुळेच मला अशा पद्धतीचे चित्रपट मिळतात असे विद्याने यावेळी सांगितले.

धक्कातंत्र हे दिग्दर्शक म्हणून सुजॉयचे शस्त्र आहे जे त्याने प्रभावीपणे ‘कहानी’मध्ये वापरले होते. इथे त्याच शस्त्राचा वापर करताना थोडीशी वेगळी मांडणी त्याने केली आहे. पण अर्थात दुर्गा रानी सिंगची कथा सांगताना एका वळणावर दिग्दर्शकाचे हे धक्कातंत्र उघडे पडते. प्रेक्षकांना पूर्ण कथा कळून चुकते आणि त्यामुळेच ‘कहानी २’च्या रहस्याचा परिणाम फिका पडतो. आपल्या नायिकेचं नाव दुर्गा रानी सिंग असलं तरी चित्रपटाच्या पूर्वार्धात ती आपल्याला बिद्या (विद्या) सिन्हा म्हणूनच भेटते. बिद्या आणि तिची अपंग मुलगी मिनी यांची ही कथा आहे. मिनीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बिद्याचं एकच ध्येय आहे ते म्हणजे अमेरिकेत मोठय़ा रुग्णालयात जाऊन मिनीवर उपचार करायचे. मिनीला सांभाळणारी नर्स, तिच्या शेजारचे काका आणि ऑफिस यात बिद्या रमली आहे.