बॉलीवूड आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अग्रवाल तिच्या फिटनेसमुळे आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. मुलाच्या जन्मानंतरही तिने स्वत:ला फिट ठेवलं असून ती तिच्या फिटनेसची योग्य काळजी घेते.
अनेकदा लोकांना झटपट वजन घटवायचं असचं त्यासाठी ते विविध उपाय करत असतात, पण काजल झटपट वजन कमी करणाऱ्या क्रॅश डाएटवर विश्वास न ठेवता ती संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनशैली पसंत करते. काजल अग्रवाल नियमितपणे योगा, पिलाटेस आणि आठवड्यातून एक-दोन वेळा वेट ट्रेनिंग करून स्वतःला फिट ठेवते.
याशिवाय, ती दिवसातून पाच वेळा पोषणमूल्यांनी भरलेला शाकाहारी आहार घेते. आई झाल्यानंतरही तिने कलरीपयट्टू (Kalari Payattu) या पारंपरिक युद्धकलेचा सराव सुरू ठेवला. सातत्यपूर्ण व्यायाम, योग्य आहार आणि सकारात्मक जीवनशैली हेच आपल्या फिटनेसचे खरे रहस्य असल्याचं काजलचं म्हणणं आहे.
योगा आणि व्यायामावर भर
काजल अग्रवालने कॉस्मोपॉलिटनला दिलेल्या मुलाखतीत तिच्या फिटनेसच्या प्रवासाविषयी सांगितल. फिट राहण्यासाठी समतोल जीवनशैली सर्वात महत्त्वाची असल्याचं तिचं म्हणणं आहे. काजल आठवड्यातून अनेक वेळा योगाभ्यास करते. विशेषतः सूर्यनमस्कार केल्याने शरीराची लवचिकता वाढते आणि मानसिक शांतता मिळते, असं तिचं म्हणणं आहे. याशिवाय ती पिलाटेस करते. तसंच आठवड्यातून एक-दोन वेळा जड वजनांसह वेट ट्रेनिंग करून स्नायूंची ताकद आणि स्टॅमिना वाढवते. हलक्या वर्कआउटच्या दिवशी ती हात आणि खांद्यांच्या टोनिंगवर अधिक भर देते.
याशिवाय, आई झाल्यानंतर काजलने घोडेस्वारी आणि कलरीपयट्टू या पारंपरिक युद्धकलेचंही प्रशिक्षण घेतलं. यामुळे तिला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत, संयमी आणि शिस्तबद्ध बनण्यास मदत झाल्याचे तिने सांगितलं. काजल अग्रवाल शाकाहारी असून, शरीराला आवश्यक ताकद मिळावी यासाठी ती पौष्टिक आहारावर भर देते. दिवसातून तीनवेळा आहार घेण्यापेक्षा ती पाच ते सहा वेळा कमी प्रमाणात अन्न खाणं योग्य समजते.
काजल ‘हे’ दोन पदार्थ खाणं टाळते
तिच्या आहारात नैसर्गिक साखरेसाठी ताजी फळे, आवश्यक जीवनसत्त्वांसाठी हिरव्या पालेभाज्या आणि आरोग्यदायी फॅट्ससाठी सुका मेवा यांचा नियमित समावेश असतो. शक्यतो ती प्रोसेस्ड (प्रक्रिया केलेले) पदार्थ आणि पांढरा भात खाणे टाळतात. याशिवाय, पुरेसे पाणी पिण्यावरही ती विशेष भर देते. नारळपाणी, ग्रीन टी, ताज्या फळांचा रस आणि दररोज सुमारे दोन लिटर पाणी पिऊन ती शरीर हायड्रेट ठेवते. त्यामुळे तिची त्वचाही निरोगी राहण्यास मदत होते.
स्कीन केअरसाठी करते ‘या’ गोष्टी
काजलच्या मते, केवळ एखादा विशिष्ट व्यायाम किंवा डाएट नव्हे, तर शिस्त आणि सातत्य हेच तिच्या फिटनेसचं खरं रहस्य आहे. ती रोज लवकर झोपते आणि लवकर उठते. चित्रपटांचं चित्रीकरण सुरू असतानाही ती दिनचर्येत सातत्य राखण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय, त्वचा हायड्रेटेड राहावी यासाठी काजल एक खास उपायही करतात. शूटिंगच्या आधी आणि नंतर त्या नारळपाण्याचे बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर फिरवते. तिच्यामते, यामुळे त्वचेला ताजेपणा मिळतो आणि ती हायड्रेट राहण्यास मदत होते.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, काजल अग्रवाल नुकत्या प्रदर्शित झालेल्या ‘कन्नप्पा’ या चित्रपटात देवी पार्वतीच्या विशेष भूमिकेत झळकली होती. सध्या ती NBK 111 या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात ती नंदामुरी बालकृष्ण यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत दिसणार असून, २०२६ मधील तिच्या महत्त्वाच्या चित्रपटांपैकी हा एक मानला जात आहे. लवकरच तिचा ‘द इंडिया स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
