Kajol’s Favourite Maharashtrian Dish : बॉलिवूड अभिनेत्री काजोल अनेकदा कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असते. काजोल तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अभिनेत्री अनेकदा मनमोकळेपणाने संवाद साधताना दिसते. अशातच आता सोशल मीडियावर अभिनेत्रीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या आवडत्या मराठमोळ्या पदार्थाबद्दल बोलताना दिसत आहे.

काजोलला तिचे वडील लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माते शोमू मुखर्जी व आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे. वडील बंगाली व आई मराठी असल्याने दोन वेगळ्या संस्कृतीतील पालकांच्या सहवासात वाढलेली काजोल आजही संस्कृतीशी आणि तिच्या मुळांसी जोडलेली आहे. अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यातील मराठीपण पाहायला मिळत आहे. आई मराठी असल्याने काजोलला मराठी पदार्थ खूप आवडतात असं तिने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीतही सांगितलं आहे. अशातच कलाकृती मीडियाने पोस्ट केलेला काजोलचा एक व्हिडीओ समोर चर्चेत आहे ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर तिच्याबद्दल बोलताना दिसत आहेत.

भारती आचरेकर यांनी सांगितला काजोलचा किस्सा

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात काजोलने एकदा हजेरी लावली होती. त्यावेळी भारती आचरेकर यांनी व्हिडीओमार्फत तिच्याशी संवाद साधला होता. त्याचवेळी त्यांनी काजोलला आवडणाऱ्या मराठमोळ्या पदार्थाबद्दल सांगत तिचा एक गंमतीशीर किस्सा सांगितला होता. व्हिडीओमध्ये काजोलला भारती आचरेकर “काजोल कशी आहेस” असं विचारतात त्यावर ती “मी बरी आहे, पण तुम्ही मला तो पदार्थ कधी बनवून पाठवणार?” असं म्हणताना दिसतात. त्यावर भारती आचरेकर पुढे म्हणाल्या, “हो मला माहिती आहे ती भाजी. आहे लक्षात पावसाळा येऊदेत.” त्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सचिन खेडेकर यांनी कोणती भाजी असं विचारल्यानंतर भारती यांनी काजोलचा जुना किस्सा सांगितला आहे.

काजोलला आवडते शेवळाची भाजी

भारती आचरेकर यावर म्हणाल्या, “शेवळाची भाजी. तुला किस्सा सांगते शेवळाची भाजी असते. ती करायला खूप कष्ट लागतात. तनू आजारी होती म्हणून मी तिला भेटायला गेले होते आणि मी शेवळाची भाजी घेऊन गेले होते. कारण मला कुठेतरी शूटिंगला जायचं होतं. तेव्हा ही आली तडतड करत कुठुनतरी आणि म्हणाली मां मला भूक लागलीये मला काहीतरी खायला दे. आता तनू बेडवर होती आजारी असल्याने मग मी म्हटलं हे बघ माझ्याकडे भाजी आणि पोळी आहे. ती म्हणाली हा मला काहीही चालेल दे. कसली भाजी आहे म्हटलं शेवळाची भाजी आहे. तिने अख्खा डब्बाभरुन भाजी आणि चार पोळ्या एकटीने खालल्या होत्या. त्यानंतर दरवर्षी मला तिला शेवळाची भाजी पाठवावी लागते”.