बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलने सिनेसृष्टीत २५ वर्ष पूर्ण केली. या २५ वर्षांत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयकौशल्याने काजोलने प्रेक्षकांची मनं जिंकली. यानिमित्ताने काजोलने २५ वर्षांच्या तिच्या प्रवासाबद्दल आणि बॉलिवूडबद्दल काही मतं, काही अनुभव एका मुलाखतीदरम्यान सांगितले. बी-टाऊनमध्ये आता कोणकोणते बदल झाले आहेत याबद्दल काही परखड मतंसुद्धा काजोलने मांडली आहेत.

या मुलाखतीत काजोल म्हणाली की, ‘९० व्या दशकात आम्ही एकावेळी एकापेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारायचो आणि बरेच चित्रपट प्रेक्षकांना आवडायचे. त्यावेळी चित्रपटच मनोरंजनाचा महत्त्वाचा माध्यम होता. त्यामुळे कोणताही चित्रपट फ्लॉप होत नव्हता. आता मात्र लोक खूप विचार करून भूमिका निवडताना दिसतात. पडद्यासमोर आणि पडद्यामागे आपण काय बोलतोय, कसे वागतोय याबाबत आता लोक विचार करताना दिसतात. ९० व्या दशकात परिस्थिती वेगळी होती आणि साहजिकच आता वेगळी आहे म्हणून त्यांचे तसे वागणेसुद्धा स्वाभाविक आहे.’

वाचा : सलमान खानची ग्रॅण्ड ईद पार्टी

९० व्या दशकात बहुतेक चित्रपट हे मल्टिस्टारर असायचे. यावरही मत मांडताना काजोल म्हणाली की, ‘आता मल्टिस्टारर चित्रपट फारसे बनवले जात नाहीत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये जरी आता काही चांगले बदल झाले असले तरी काही बदल विशेष नाहीत असं मला वाटतं. त्यावेळी सर्व कलाकार एकमेकांना जवळून ओळखायचे. एकमेकांच्या कुटुंबाविषयी, मुलांविषयी माहिती असायची. मात्र आताचे सर्व कलाकार आत्मकेंद्रीत झाले आहेत. बी-टाऊनमध्ये आता ‘मी’पणाला खूप महत्त्व आहे. इतरांबद्दल खूप असुरक्षितता निर्माण झाली आहे.’
वाचा : आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता

बॉलिवूडचे विश्व आता खूप विस्तारले असून करिअरसाठी यामध्ये खूप पर्याय निर्माण झाले आहेत असंदेखील काजोल यावेळी म्हणाली. काही चांगले आणि काही वाईट बदल बी-टाऊनमध्ये झाल्याचं काजोल म्हणतेय. लवकरच तिचा ‘VIP 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता धनुषसोबत काजोल भूमिका साकारणार आहे.